नवी मुंबई : ‘नवी मुंबईकरांना कोणी अक्कल शिकवण्याची गरज नाही. नवी मुंबई हे गेल्या २५ वर्षांत घरपट्टी किंवा पाणीपट्टी न वाढवलेले शहर आहे. येथील शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभाग तुमच्या शहरांच्या तुलनेत १०० पटीने पुढे आहेत,’ अशा शब्दांत नाईक यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आज वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात भरवण्यात आलेल्या जनता दरबारानंतर माध्यमांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या युवासेना मेळाव्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईतील पाणी टंचाईच्या प्रश्नावर महापालिकेवर टीका करताना अप्रत्यक्षपणे वन मंत्री गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला गणेश नाईक यांनी आज चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले.
युवासेनेच्या मेळाव्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. ते म्हणाले होते की नवी मुंबईत काही स्मशानभूमीना छत नाही, रस्ते नाहीत, सीआरझेडचे कारण दिले जाते, मग तुम्ही कसली सत्ता उपभोगलीत? या आमच्या ठाण्यात आणि आमचे रस्ते बघा, स्मशानभूमी बघा, पाणी प्रश्न बघा आणि उद्याने बघा.
या टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी खासदार नरेश म्हस्के यांना नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, नवी मुंबईत सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह इतर विरोधकांकडून महापालिकेच्या आणि पर्यायाने वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, नाईक यांनी आजचा जनता दरबार यशस्वीपणे पार पाडत, उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गणेश नाईक यांच्या आजच्या प्रत्युत्तरामुळे विरोधकांशी रंगतदार शाब्दिक चकमक होण्याची चिन्हे आहेत.