नवी मुंबई – नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-जास्त होत असला तरी कालपासून (रविवार) पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता. रविवार पासून या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. नवी मुंबईसह इतर शहरात पावसाचा जोर वाढला आहे. नवी मुंबई परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील काही तासांत पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नवी मुंबईच्या नेरूळ शहरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच बेलापूर, वाशी,कोपरखैरणे, ऐरोली भागातही पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मागील २४ तासांत (१७ ऑगस्ट सकाळी ८.३० ते १८ ऑगस्ट सकाळी ८.३०) सरासरी ११५.१७ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

कमी दाब क्षेत्र

बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, उदयपूर, रतलाम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, जगदलपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकणाच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, कोकण, उत्तर मराठवाडा, ते दोन्ही कमी दाबाच्या केंद्रांदरम्यान १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मोरबे धरणाची स्थिती

नवी मुंबईकरांच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मोरबे धरण परिसरात काल ७७.६० मिमी पाऊस झाला. आतापर्यंत धरण क्षेत्रातील एकूण पर्जन्यमान २५२२.६० मिमी वर पोहोचले आहे.
तर, धरणाची पातळी सध्या ८५.४० मीटर असून ती ८७.१० टक्के इतकी भरली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भरतीची माहिती

आज सायंकाळी ६.५१ वाजता समुद्रात ३.०८ मीटर उंचीची भरती येणार आहे. किनारपट्टी परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभागनिहाय पाऊस

नेरुळ – १४७.६० मिमी (सर्वाधिक पाऊस)

बेलापूर – १३६.६० मिमी

वाशी – १३१.६० मिमी

कोपरखैराणे – १०५.६० मिमी

ऐरोली – ९२.२० मिमी

दिघा – ७७.४० मिमी (सर्वात कमी)

यामुळे १ जूनपासून आजपर्यंत नवी मुंबईत एकूण १९४८.७८ मिमी पाऊस झाला असून, सरासरी हंगामी पर्जन्यमानाचा मोठा टप्पा पावसाने पूर्ण केला आहे.