नवी मुंबई : वाशीतील एम.जी. कॉम्प्लेक्सअंतर्गत ‘रहेजा रेसिडेन्सी’ इमारतीत घडलेल्या अग्नितांडवामुळे सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात इमारतींच्या अग्निसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांत शहरात तब्बल ५९३ आगीच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर आकडेवारीमुळे शहरातील अग्निसुरक्षेची स्थिती चिंताजनक बनली असून, इमारतींचे अग्निसुरक्षा लेखपरीक्षण तातडीने करण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात दरमहा सरासरी ५० ते ६० आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमागे शॉर्टसर्किट, गॅस गळती आणि इमारतींमधील निष्क्रिय अग्निसुरक्षा यंत्रणा ही प्रमुख कारणे असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. अनेक इमारती अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असून, शहरातील अनेक इमारतींमध्ये अद्याप अग्निसुरक्षा तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, शहरातील एकूण १,४१४ इमारतींपैकी १,२९२ इमारतींचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. जानेवारीपासून ऑक्टोबरअखेरपर्यंत १,२९२ इमारतींनी ‘अग्निशमन (ब) प्रमाणपत्र’ नूतनीकरण केले आहे. तर ४३ इमारतींच्या व्यवस्थापनाने तपासणी शुल्क भरले असून त्यांचे लेखापरीक्षण प्रलंबित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ७९ इमारतींनी आपल्या अग्निसुरक्षा लेखपरिक्षणासाठी अद्याप अर्जच केलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अग्निशमन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि तातडीने अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करून घेण्यासाठी अग्निशमन विभागाने या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.

शहरातील अनेक व्यावसायिक संकुल, सोसायट्या आणि कार्यालयीन इमारतींनी अग्निशमन यंत्रणेची नियमित देखभाल न केल्यामुळे धोका वाढतो आहे. तसेच, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अटळ असल्याचे अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अग्निशमन विभागाच्या तपासणीत अनेक इमारतीतील फायर पंप, हायड्रंट, स्प्रिंकलर आणि अलार्म प्रणाली कार्यरत ठेवण्याकडे निष्काळजीपणा दिसून आला आहे. नुकत्याच घडलेल्या वाशीतील आग दुर्घटनेत ४ जण मृत्युमुखी पडले होते. तेव्हा इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली असता यंत्रणेत अनेक त्रुटी असल्याचे आढळले होते. तर काही इमारतींमध्ये फायर कंट्रोल रूमच बंद अवस्थेत आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही परिस्थिती अतिशय गंभीर असून, इमारतीतील रहिवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचे मत अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अशा गंभीर परिस्थिती इमारतींच्या व्यवस्थापनाने तातडीने आपल्या इमारतींचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करून घ्यावे असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

त्यामुळे नवी मुंबईला जर खऱ्या अर्थाने ‘सुनियोजित’पणा चा दर्जा टिकवायचा असेल, तर केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात अग्निसुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक जागरूकता वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.

नियमानुसार वर्षातून दोनदा आपल्या इमारतीचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण बंधनकारक आहे. असे असूनही अनेक इमारतींकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाने इमारतीतील रहिवाशांचा जीवाला धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतेवेळीच आपल्या इमारतींचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करून घ्यावे अशी आमची नागरिकांना विनंती आहे. -पुरुषोत्तम जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, नमुंमपा अग्निशमन विभाग

जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ मधील आगीच्या घटना

  • सीबीडी बेलापूर – ९८
  • नेरुळ – १२६
  • वाशी – १५३
  • कोपरखैरणे – १३६
  • ऐरोली – ८०
  • एकूण – ५९३