नवी मुंबई : वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे उद्धघाटन दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु ती सुध्दा पोकळ आरोळी ठरली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानेही लवकरच मुंबईकडे जाणारा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला केला जाणार असे सांगितले होते. परंतु ही सगळी आश्वासने हवेत विरली आहेत.
वाशीवरुन मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या वाशी खाडीपुलावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर मानखुर्दच्या दिशेने नवी मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले असून मानखुर्दकडून वाशीकडे येणारी वाहतूक सुरळीत व वेगवान झाली आहे. मुंबईकडे जाणारा उड्डाणपूल अद्याप खुला केला नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शासनाच्या टोलमाफीनंतर वाशी टोलनाका व उड्डाणपुलावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाल्याने वाहनचालकांना सततच्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाशीवरुन टोलनाक्याजवळ मुंबईला जाताना ११ लेनची वाहतूक दुसऱ्या उड्डाणपुलाच्या तोंडाशी टोलनाक्यावर फक्त दोन लेनमध्ये वर्ग होत असल्याने वाहनचालक वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. एल अॅन्ड टी कंपनीनेही आमचे काम पूर्ण झाले आहे असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कळवून अनेक दिवस उलटले तरी अद्याप मुंबईकडे जाणारा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला केला जात नाही.
नवी मुंबई, मुंबईला जोडणारा पहिला खाडीपूल १९७१ तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू करण्यात आला होता. आता तिसरा खाडीपुल पूर्णत्वास आला असल्यामुळे वाशी मुंबई व मुंबई वाशी वाहतुकीसाठी नव्या दोन उड्डाणपुलावर प्रत्येकी ६ लेन उपलब्ध होणार आहेत.
मुंबईकडे जाणाऱा तिसरा उड्डाणपुल वाहतूकीसाठी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत काय अडचण आहे का याबाबत उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल – नरेश म्हस्के, खासदार
वाशीहून मुंबईकडे जाणारा तिसरा उड्डाणपुल तयार असूनही वाहतूकीसाठी खुला केला जात नसल्याने कर्तव्यावर असलेल्या आमच्या वाहतूक पोलिसांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे – दिलीप गुजर, पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक नियंत्रण कक्ष
पोलिसांवर राग
वाहतुकीसाठी तयार असलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या खोळंब्याचा राग उन्हातान्हात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना सहन करावा लागत आहे. वाहनचालक आता आक्रमक झाले असून कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीसांवरच राग व्यक्त करु लागले आहेत.