नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे येथील ट्रक टर्मिनल मध्ये रात्री साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीवर पहाटे पर्यंत नियंत्रण मिळवले असले तरी दुपारपर्यंत कुलिंगचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे आगीत नेमके किती नुकसान झाले हे समोर आले नाही.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट नजीक तुर्भे सेक्टर २० येथे ट्रक टर्मिनल आहे. या ठिकाणी एपीएमसीला येणाऱ्या गाड्या मुक्कामी थांबत असतात. अशा गाड्यातील माल उतरून ठेवण्यासाठी येथे एक गोडाऊन स्वरूपात माल ठेवण्यात येतो. याच गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा माल ठेवण्यात आला होता. या गोडाऊन मध्ये रात्री साडे आकाराच्या सुमारास आग लागल्याची वर्दी वाशी अग्निशमन दलास मिळाली होती. तुर्भे एमआयडीसी नेरूळ एमआयडीसी , कोपरखैरणे वाशी नेरूळ अशा ठिकाणच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.
आगीत प्लास्टिक असल्याने आग विझवली तरी काही वेळाने एखाद्या ठिणगीने पुन्हा आग पकडली जात होती. त्यात पाऊस अधून मधून जोरदार पडत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. आग ट्रक पर्यंत आली असती तर एकामागून एक ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडण्याची भीती होती. या परिस्थितीतून आगीवर पहाटे पर्यंत नियंत्रण मिळवण्यात आले. आज दुपार पर्यंत कुलिंगचे काम चालणार आहे. अशी माहिती वाशी अग्निशमन दलाने दिली.
आगीत गोडाऊन मधील माल जळून गेला आहे. हा माल लाखो रुपयांचा होता. तीन टेम्पो ट्रक तीन पूर्ण जळून खाक झाल्या असून किमान आठ ते दहा गाड्यांनी आगीची झळ पोहचली आहे. याशिवाय भाज्या किंवा अन्य फळे वस्तू ठेवण्यात येतात ते प्लास्टिक कॅरेट शेकडो आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सुदैवाने जीवित हानी झाल्याचे अद्याप समोर आले नाही.