नवी मुंबई : मुसळधार पाऊस अथवा अतिवृष्टीच्या काळात वाशीकरांना पुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी खाडी आणि धारण तलावाच्या (होल्डिंग पाॅण्ड) सीमेवरील वाशी सेक्टर ८ येथील पंप हाऊसच्या कामाला अखेर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली आहे.

२६ जुलैच्या प्रलयकारी पावसातही हे पंप हाऊस आणि लगत असलेल्या धारण तलावामुळे वाशीकरांची पुराच्या पाण्यातून लवकर सुटका झाली होती. आधी कोविडचे संकट आणि त्यानंतर पर्यावरण विभागाच्या वेगवेगळ्या परवानग्यांच्या प्रक्रियेत हे काम लांबले होते. वाशीकरांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. अखेर महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी पाच वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

दुरवस्था झालेल्या या पंप हाऊसची नव्याने उभारणी व्हावी यासाठी या भागातील तत्कालीन स्थानिक नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पाठपुरावा केल्यानंतर जून २०१९ मध्ये या कामाच्या मंजुरीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या कामाची निविदा सप्टेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. कोविडमुळे हे काम लांबले. मे २०२१ मध्ये पंप हाऊसचे जवळपास ३० कोटी रुपयांचे काम सुरू करण्याचे कार्यादेश देण्यात आले. कोविड साथरोगामुळे या कामास मुदतवाढ देण्यात आली. याच दरम्यान सीआरझेड तसेच फ्लेमिंगो अभयारण्य संवेदनशील क्षेत्रासंबंधीच्या परवानग्या घेणे या कामासाठी बंधनकारक करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात माहितीसाठी दाखल करण्यात आले. न्यायालयात १५ सुनावण्यांनंतर ६ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यास मंजुरी देण्यात आली. मध्यंतरी पावसाळ्यामुळे हे काम सुरू करता आले नव्हते. अखेर दोन दिवसांपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे काम सुरू करण्यात आले आहे.

पंप हाऊसचे कार्य

  • नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खाली आहे. भरतीच्या काळात पावसाचे पाणी वाहून जाणारी ठोस यंत्रणा नसल्यामुळे मुंबईत अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते.
  • सिडकोने शहराची निर्मिती करत असताना नेमका हा मुद्दा हेरला आणि हाॅलंड देशाच्या धर्तीवर नवी मुंबईतील प्रत्येक उपनगराच्या खाडीमुखावर धारण तलावांची निर्मिती केली.
    -या धारण तलावांना खाडीच्या दिशेने लागून पंप हाऊस उभारले. धारण तलाव आणि खाडीच्या मुखावर फ्लॅप गेटस् (उघडझाप होणारे दरवाजे) उभारले.
  • पाऊस वाढला आणि धारण तलावही भरू लागले तर पंप हाऊसमधील यंत्रणांच्या मदतीने पाणी खाडीत फेकण्याची आधुनिक यंत्रणाही उभारण्यात आली आहे.

धारण तलावाची सफाई महत्त्वाची

दरम्यान, पंपिंग स्टेशनचे काम सुरू करण्यात आले असले तरी या भागातील धारण तलावाच्या सफाईचा मुद्दा आता गंभीर ठरू लागला आहे. धारण तलावात मोठ्या संख्येने असलेल्या खारफुटीमुळे येथील सफाई करण्यास मज्जाव आहे. त्यामुळे धारण तालवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात हे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया या भागातील माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.