नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक करिता प्रभाग रचना व आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने पार पडली असून प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्दी विषयक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची तसेच एका मतदार केंद्रावर ८०० ते ९०० मतदार आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिले आहेत .

मतदान केंद्र निश्चिती विषयी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठक घेतली . निवडणूक कार्यक्रमाबाबत वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश संबधित अधिकारी, कर्मचारीवृंदांना दिले. याप्रसंगी निवडणूक विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, निवडणूक मतदार यादीकरिता नियुक्त प्राधिकृत व नियंत्रक अधिकारी परिमंडळ २ उपआयुक्त . संजय शिंदे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदार यादी तयार करत नसून भारत निवडणूक आयोगाकडून तयार होणारी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येते. या करिता १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करुन मतदार यादी तयार करण्यात येते. ही प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार प्रसिध्द केली जाणार असून त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी कालावधी दिला जाणार आहे.

प्रारुप मतदार यादीत नव्याने कोणतेही नाव समाविष्ट होणार नसून प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीत लेखनिकांच्या काही चुका असल्यास, दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास, तसेच संबधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे समाविष्ट करणे, त्याचबरोबर मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास त्यांची नोंद मार्क कॉपी मध्ये सुधारणा , दुरुस्ती करता येईल.

विहित मुदतीत प्राप्त होणा-या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करुन आवश्यक त्या सुधारणा मतदार यादीमध्ये करण्यासाठी व अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून विभाग प्रमुख व त्यांना सहाय्यक म्हणून इतर अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परस्पर समन्वयाने नियमानुसार काम करावे असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. या मतदार यादीत विषयक कामकाजाकरिता परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे यांची प्राधिकृत व नियंत्रक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या समन्वयाने बिनचूक अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे.

तसेच मतदान केंद्राच्या जागा निश्चित करतांना विधानसभा निवडणूकीसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने महापालिका निवडणूकीसाठी एका मतदान केंद्रावर सरासरी८०० ते ९०० मतदारांचे मतदान असणार आहे मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना जास्त लांब जावे लागू नये याचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व इतर आवश्यक सोयी सुविधा देण्याबाबतही जागांची पाहणी करतांना सर्वोतोपरी विचार व्हावा असेही सूचित करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत याबाबतची माहिती पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच मतदान केंद्र निश्चितीबाबतही निकषांनुसार कार्यवाही करावी. डॉ. कैलास शिंदे ,आयुक्त नवी मुंबई महापालिका