संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : विसर्जनावेळी तलावांवर होणारी गर्दी टाळून सुरक्षित अंतराचा नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिका शहरात १३५ तलाव उभारणार आहे.

करोनाकाळात शहरातील तलावावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. दीड,पाच दिवस, सात दिवसांचे तसेच  अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे  दीड दिवसांचा गणेशोत्सव  साजरा करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात कृत्रिम तलाव तयार करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागा या तलावांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरातील नैसर्गिक तलावांचा वापर टाळण्यावर पालिकेचा भर राहणार आहे.

चार फुटांपर्यंतची मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करता येणार आहे. यासाठी एमएस प्रकारच्या चौकटी असतील. त्यात लायनरचे कापड वापरले जाणार आहे.  हे  तलाव १० बाय १२ फूट रुंद आणि चार फूट खोल असतील. तसेच विसर्जनानंतर कृत्रिम तलाव घडी घालून ठेवता येणार आहेत.

नैसर्गिक तलावांत मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर या तलावात मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसचा गाळ साचतो. त्यामुळे तलाव स्वच्छ करण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागतो. परंतु आता कृत्रिम तलावांचा वापर काही वर्ष होणार असल्याने खर्चाची बचत होण्याची शक्यता असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.

तलाव कुठे?

’ बेलापूर विभाग— १५

’ नेरुळ— २७

’ वाशी—१६

’ तुर्भे—१७

’ कोपरखैरणे—१४

’ घणसोली—१७

’ ऐरोली—२२

’ दिघा—७