नवरात्रोत्सव व उरण परिसरात निर्माण झालेले दहशतवादी भीतीचे वातावरण यामुळे नवी मुंबई पोलिसांनी बेकायदा बांधकामांवरील कारवाईला प्राधान्य देण्यास नकार दिल्याने बेलापूर परिसरात महिन्याच्या प्रारंभी होणाऱ्या काही बांधकामांवरील कारवाईला खीळ बसली होती; पण आता पोलिस बंदोबस्त मिळताच बेकायदा बांधकामांवर पालिका हातोडा चालविणार आहे. यात अ, ब, क, अशी वर्गवारी करण्यात आली असून पालिकेच्या नोटिसांना न जुमानता बांधकाम सुरू ठेवणाऱ्यांना लक्ष्य केले जाणार आहे.
नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. त्याबद्दल न्यायव्यवस्थेसह शासनानेही चिंता व्यक्त केली आहे. बेकायदा बांधकामांचा हा आकडा शहरातील एकूण बांधकामांच्या ८० टक्के असण्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अशा बांधकामांचे उच्चाटन करण्यास प्राधान्य दिले आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेली ही मोहिम आता दसरा संपल्यानंतर लागलीच पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच १९ हजार पेक्षा जास्त बेकायदा बांधकामांना नोटीस देण्यात आल्या असून यात घरातील बाल्कनींना केलेले कायमस्वरुपी बांधकामांपासून ते संपूर्ण इमारत रातोरात उभ्या करण्यात आलेल्या बांधकामांचा समावेश आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना गरीब गरजू आणि अनेक वर्षे राहणाऱ्या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ येऊ नये यासाठी वेगळे धोरण स्वीकारण्याची तयारी पालिकेने केली आहे; मात्र जमीनही मालकीची नसताना उभारलेल्या बांधकामांवर पालिका येत्या आठवडय़ात कारवाई करणार आहे.
अशा बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविण्यासाठी पालिकेने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सर्व तयारी केली होती; पण नवरात्रोत्सव आणि उरण परिसरात दहशतवादी घुसल्याची निर्माण झालेल्या अफवा यामुळे नवी मुंबई पोलिसांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास पोलिस बंदोबंस्त देण्यास नकार दिला. त्यामुळे ही कारवाई पुढे ढकल्यात आली होती. ती आता या महिनाअखेर पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर तत्काळ केली जाणार आहे. नवी मुंबईतील गावठाण विस्तार तसेच पालिका जमिनीवर अशा प्रकारे काही बेकायेदा बांधकामे सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. दिवा ते दिवाळ्यापर्यंत अशी भूमाफियांची ४० ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे सुरु आहेत. त्यावर पहिल्यांदा हातोडा पालिका चालविणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.