नवी मुंबईतील अतिसंक्रमित क्षेत्रात निर्बंध कायम आहेत. या क्षेत्राच्या चतु:सीमा बंद करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा पालिकेने दिली आहे. मात्र पोलिसांकडून त्यांची वाहने अडवली जात आहेत.

सोमवारी नवी मुंबईतील टाळेबंदीचे काही नियम शिथिल करण्यात आले, मात्र शहरातील ४२ प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बांबू आडवे टाकून बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये पादचाऱ्यांना ये-जा करण्याची सोय आहे, मात्र  क्षेत्राच्या सीमेबाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहने अडवली जात आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी सेवा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना गरजेनुसार पोहोचावे लागते. यात सामाजिक अंतर आणि टाळेबंदीतील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.

सर्वच कर्मचारी दुचाकी वा चारचाकी वाहन सेवा देतात. तरीही पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. काही वेळेला पोलिसांशी वाद घालण्याचेही प्रकार घडले आहेत. अनेकदा प्रतिबंधित क्षेत्रातील बडय़ा राजकारण्यांच्या गाडय़ा फिरताना पोलिसांना त्या कशा दिसत नाहीत, असा सवाल काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.