मागील आठवड्यात मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कांद्याचे दर वधारून प्रति किलो ३५ ते ३६ रुपयांवर गेला होता . मात्र आज सोमवारी बाजारात कांद्याच्या दारात ५ ते ६ रुपयांनी घसरण झाली असून प्रति किलो ३० रुपयांवर आलेला आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेशमधील कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने राज्यात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. एपीएमसी बाजार देखील कांद्याचे दर कमी झाले आहेत.
हेही वाचा- मोरा- मुंबई जलसेवा तीन तास बंद राहणार; बंदरातील गाळामुळे प्रवाशांचा खोळंबा
एपीएमसी घाऊक बाजारात दोन आठवड्यापूर्वी कांद्याचे दर स्थिर होते . परंतु मागील आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन ५ ते १० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे बाजारातही कांदा ४० ते ४५ रुपयांवर गेला. मागील एक ते दोन महिन्यांत राज्यात परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाला . त्यामुळे साठवणूकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे . त्यामुळे बाजारात उच्चतम प्रतिचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत आहे. उच्चतम प्रतीच्या कांद्याची दरवाढ होत होती. परंतु महाराष्ट्र राज्यात मध्य प्रदेश येथील कांद्याचे आवक होत आहे. त्याचबरोबर इतर राज्यातही मध्य प्रदेश मधील कांदा मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे . याचा परिणाम राज्यातील कांद्याच्या दरावर होऊ नये म्हणून नाशिक बाजारात कांद्याचे दर कमी करण्यात आल्याचे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी एपीएमसी बाजारात एकूण दीडशे गाड्या दाखल झाल्या आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने दर गडगडले आहेत. मागील सोमवारी कांद्याला २५ ते ३५ रू दर होता तर या सोमवारी २० ते ३० रुपयांनी विक्री होत आहे. आठवडाभर अशी स्थिती राहील असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यानंतर पुन्हा कांद्याची दर वाढ होण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे.