वाशीतील घाऊक बाजारात आवक कमी

नवी मुंबई : हळवी कांद्याचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने वाशीतील एपीएमसी बाजारात या कांद्याची आवक बुधवारीही कमी झाल्याने दरात पाच रुपयांची वाढ झाली. त्यामुळे घाऊक बाजारात तो ४५ रुपये किलोपर्यंत गेला असून किरकोळीत ५५ ते ६५ रुपये किलोवर पोहोचला आहे.

पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून वाशीतील कांदा बाजारात हळवी कांद्याची आवक होते. हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, गरवी (उन्हाळी कांदा) कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ही आवक कमी होत आहे.  दिवसाला शंभर गाड्यांची आवक होत असते. बुधवारी फक्त ८० गाड्या कांदा आवक झाली.

बाजारात २५ ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत असलेला कांदा आवक कमी होऊ लागल्याने मागील आठवड्यात ४० रुपयांपर्यंत गेला होता. बुधवारी परत आवक कमी झाल्याने त्यात ५ रुपयांची वाढ झाली असून आता तो घाऊक बाजारात ४५ रुपयांवर पोहोचला आहे. बाजारात नवीन कांदा दाखल होताच दर आवाक्यात येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दिवाळीत पडलेल्या पावसाने कांद्याच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली.  दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात झाली, मात्र पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन कमी झाले. तसेच कांदा आवक होण्यास विलंब झाला. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.

नवीन कांदा भाव खातोय

एपीएमसी बाजारात नवीन कांदाचा बाजारभाव हे जुन्या कांद्यापेक्षा कमी असतात; परंतु दोन वर्षांपासून हे चित्र बदलले असून नवीन कांद्याचे दर चढे राहत आहेत. दरापेक्षा १० ते २० रुपयांनी नवीन कांदा स्वस्त असतो, परंतु आवक कमी होत असल्याने नवीन कांदाचा दर वधारला आहे.