शहरात ९२३ उपचाराधीन रुग्ण

नवी मुंबई</strong> : शहरात करोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून सद्य:स्थितीत करोनाचे फक्त ९२३ रुग्ण आहेत. त्यातील दोनशे रुग्ण हे वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात तर दोनशे रुग्ण नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत व शंभर रुग्ण हे खासगी रुग्णालयात असून निम्मे रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या ५० हजार ७९१ पेक्षा जास्त झाली आहे तर आतापर्यंत १०४६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  मागील सहा महिन्यांत नागरिकांमध्ये करोनाबाबत भीतीचे वातावरण कमी झाल्याचे दिसून येत आहे. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून  सात महिन्यांनंतर प्रथमच सोमवारी नवे रुग्ण ५० च्या खाली सापडले आहेत. नवीन रुग्ण कमी होत असताना करोनामुक्त होणाचे प्रमाणही वाढत असल्याने करोनामुक्तीचा दर ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सद्य:स्थितीत शहरात ९२३ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. जुलै महिन्यात हा आकडा सर्वाधिक ३ हजार ९८६ पर्यंत गेला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाला उपचार सुविधांत वाढ करावी लागली होती. शहरात १३ करोना काळजी केंद्रांसह पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात व नेरुळ येथील डॉ. डी.वाय पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. रुग्णसंख्या घटल्याने आता वाशी येथील पालिकेचे रुग्णालय सामान्य रुग्णालय करण्यात आले असून १३ पैकी १२ करोना काळजी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. करोना झाल्यानंतर आता रुग्ण काळजी केंद्रात जाण्यापेक्षा गृह अलगीकरणात राहण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे ९२३ रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण हे गृह अलगीकरणात असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

६० नवे रुग्ण

नवी मुंबई : नवी मुंबईत मंगळवारी ६० नवे करोनाबाधित आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९१ जण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५०,८५१  इतकी झाली असून मृतांचा आकडा १०४८   इतका झाला आहे.  करोनामुक्तीचा दर ९६ टक्के असून एकूण ४८,९१३ जण करोनामुक्त झाले आहेत.

उपचाराधीन रुग्णांत घट

* २३ जून : १८९४

* २३ जुलै : ३९८६

* २३ ऑगस्ट : ३४४९

* २३ सप्टेंबर : ३५८५

* २३ ऑक्टोबर : २५४८

* २९ ऑक्टोबर : १९०९

* १ नोव्हेंबर : १७५८

* २८ डिसेंबर :  ९२३

नवी मुंबई शहरात उपचाराधीन रुग्ण मागील सहा महिन्यांत १ हजाराच्या खाली आले आहेत. त्यामुळे करोनामुक्तीचा दर हा चांगला आहे. जवळजवळ ५० टक्क्यांपेक्षा अधिक करोना रुग्ण गृह  अलगीकरणात आहे. उपचाराधीन रुग्ण कमी होणे शहरासाठी चांगले संकेत आहेत.

– संजय काकडे, अतिरिक्त आयमुक्त, नवी मुंबई महापालिका