नवी मुंबई : पाम बीच रोडवरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीए. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी पुन्हा एकदा अक्षर सिग्नलजवळ अशाच प्रकारचा अपघात घडला. पामबीच रस्त्यावरून भरधाव वेगात चालणारी थार एसयूव्ही कार थेट दुभाजकावर धडकली. मात्र अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, परंतु त्या वेळी गाडीत कोणीही नव्हते. वाहनाच्या नोंदणी तपशीलांचा मागोवा घेतल्यावर ही गाडी उरण येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले आहे. त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने ही गाडी आपल्या मित्राला दिल्याचे सांगितले. दुभाजकाला छेदून गाडी आतील झाडाला धडकल्याने गाडीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी आता या मित्राचा शोध सुरू केला आहे. अद्याप त्याच्याशी संपर्क साधता आला नसल्याने चौकशी प्रक्रियेला वेळ लागत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त थार गाडी रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली असून, प्रत्यक्षात अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाम बीच रोडवर अलिकडच्या काळात वारंवार अपघात घडत असल्याने या मार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.