करोना नियमांबाबत हलगर्जीपणा

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : महापालिका हद्दीत गेल्या दहा दिवसांत नवीन करोना रुग्णांची भर पडली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पनवेलकरांची पुन्हा करोना चिंता वाढली आहे. पालिका प्रशासनाने करोना नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी नवी नियमावलीचे पत्रक काढले आहे, मात्र आशा परिस्थितीत महापौरांकडूनच आंदोलनासाठी गर्दी जमवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांकडूनही नियमांचे पालन होताना दिसत नाही. पालिका प्रशासनाने गेल्या दहा दिवसांत ५,७१४ जणांचा करोना चाचण्या केल्या आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी पालिका क्षेत्रात दैनंदिन ४० ते ४५ करोना रुग्ण सापडत होते. ही संख््या आता दुपटीने वाढली असून ती ७५ ते ८० पर्यंत पोहचली आहे.त्यामुळे पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सामाजिक अंतर न पाळणे, मुखपट्टी न लावता घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिका दंडाची कारवाई करेल अथवा विनापरवानगी गर्दी जमविल्यास पोलीस थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे आदेश दिले असतानाही हे नियम शहरात पाळले जात नाहीत. आठवडाभरात मुखपट्टी न वापरणाऱ्या ४०५ व्यक्तींकडून २ लाख २८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर लोकप्रतिनिधीही आशा परिस्थितीत आंदोलने करीत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शनिवारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी ‘शरद पवार जागे व्हा’ या आंदोलनात द्रुतगती महामार्ग रोखण्यासाठी पन्नास महिलांना सोबत घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. मात्र आंदोलनात कोणतेही सामाजिक अंतर पाळले गेले नव्हते.  कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी महापौर कविता चौतमोल यांच्यासह सभापती मोनिका महानवर, सदस्य चारूशिला घरत यांच्यासह इतर ३७ महिला कार्यकर्त्यांंवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता १८८ चा मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यासोबत साथरोग नियंत्रण प्रतिबंधक कायदान्वये, सामाजिक अंतराचे नियम न पाळल्याने गुन्हा नोंदवून त्यांना सोडण्यात आले. लवकरच  त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोप दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

कळंबोली येथील करोना काळजी रुग्णालय सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत या निविदेची अंतिम तारीख आहे. काही साहित्याचा या ठिकाणी तुटवडा असून त्यासाठी सिडकोकडे पत्रव्यवहार केला आहे.  त्यानंतरच हे रुग्णालय सुरू करण्यात येईल. पालिकेमध्ये अजून करोना चाचण्या वाढविण्यासाठी पालिकेच्या सहा नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्रतिजन चाचण्यांची व्यवस्था केली आहे.

-डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका

४०५ जणांवर घरीच उपचार पनवेलमधील करोनाबाधित

४०५ जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. २५ फेब्रुवारीपर्यंत ५१२ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी १०७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक ४२ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.