पनवेल – पनवेल तालुक्यातील तळोजा आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील कामगारांसाठी आरोग्य सेवा हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ईएसआयसी) रुग्णालय उभारण्याचा निर्णय वारंवार लांबणीवर टाकला जात असल्याने कामगारांना उपचारासाठी लांब प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नुकत्याच १७ सप्टेंबर रोजी पनवेल इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेट येथे झालेल्या विशेष बैठकीत उद्योजक संघटनांनी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी “प्रत्येक औद्योगिक वसाहतीत किमान एक दवाखाना” सुरू करण्याचा ठोस प्रस्ताव मांडला. 

रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑगस्टला झालेल्या उद्योग सुसंवाद बैठकीत उद्योजकांनी ईएसआयसी मंडळाच्या कामकाजाविषयी गंभीर तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी इएसआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट चर्चेसाठी बोलावून घेतले. त्यानुसार ईएसआयसीचे सह – संचालक सुधाकर सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामगारांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ईएसआयसीकडून ठोस निर्णय अपेक्षित असल्याची मागणी सर्व उद्योजक संघटनांनी एकमुखाने केली.

पनवेल व तळोजा औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुमारे ५० हजारांहून अधिक कायम व कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. परंतु आजवर एकही स्वतंत्र ईएसआयसी रुग्णालय उपलब्ध नाही. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांसाठी एकही प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नाही. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या साध्या आजारांसाठी आणि अपघातातील गंभीर उपचारांपर्यंत कामगारांना पनवेल किंवा कळंबोलीला धाव घ्यावी लागते. फक्त प्रवासासाठीच ३०० ते ४०० रुपये रिक्षा भाडे मोजावे लागते.

एमआरआय, सोनोग्राफी, हृदयरोग उपचार यंत्रणा तळोजासारख्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात खासगी रुग्णालय सुद्धा नसल्याने कामगारांची प्रचंड हेळसांड होत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटनासमोर आल्या आहेत. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ईएसआयसी रुग्णालयासाठी २ एकर भूखंड देण्याची तयारी दाखवली होती, मात्र ईएसआयसीने निकषाप्रमाणे १०० खाटांचे रुग्णलायासाठी ५ एकर जागेची मागणीवर ठाम असल्याने रुग्णालयाचा विषय अडखळला. परिणामी ना रुग्णालय, ना दवाखाना अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कामाला वेळ लागणार असल्याने तत्पूर्वी पनवेलमधील प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात दवाखाने सुरू करून कामगारांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ईएसआयसी मंडळाला तातडीने पुढाकार घेण्याचे आदेश दिले. तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रात रुग्णालय व दवाखाना उभारणीसाठी योग्य भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देश एमआयडीसीला देण्यात आले. यासोबतच पुढील महिन्यात सविस्तर आढावा बैठकीचे आयोजन करण्याचेही ठरविण्यात आले.  

चौकटपनवेलमधील उद्योजकांना उत्पादन घेताना येणारे विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी लघु उद्योग भारतीचे प्रदेशमंत्री गौरव जोशी, मिलिंद गांगल, पनवेल को.ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटचे विजय लोखंडे, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटचे स्वप्नील गुप्ते, तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (टीएमए) शेखर श्रुंगारे यांनी उद्योजकांच्या समस्या या बैठकीत मांडल्या.

टीएमएचे अध्यक्ष शेखऱ श्रुंगारे यांनी तळोजात रुग्णालयाची व्यवस्था करण्याची मागणी केल्यावर जिल्हाधिकारी जावळे यांनी तळोजा विस्तारीत एमआयडीसीमध्ये ५ एकरचा भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्याची सूचना केली. तसेच खालापूर तालुक्यातील पाताळगंगा येथे एचओसी कंपनीचे रुग्णालयाची जुनी इमारत वापरण्यायोग्य आहे का याची चाचपणी करण्याची मागणी उद्योजकांनी केली. या दोन्ही बाबींवर जिल्हाधिका-यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.