नवी मुंबई : सिडकोमधील भ्रष्ट कारभाराचे नवे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सुद्धा लाच मागण्याचा प्रकार आता समोर आला असून, नवी मुंबईतील जुईनगर येथील एका गणेशोत्सव मंडळाने या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मंगळवारी सिडकोच्या क्षेत्रीय अधिकारी स्मिता ठाकूर आणि कंत्राटी कामगार योगेश कोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

जुईनगर सेक्टर २४ मधील एका सार्वजनिक मंडळाने गणेशोत्सवासाठी ३० बाय ३० आकाराचा मंडप उभारण्यासाठी रिक्त भूखंड वापरण्याची परवानगी घेण्यासाठी सिडकोकडे अर्ज केला होता. नियमानुसार जागामालकांची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने मंडळाने सिडकोच्या नेरुळ कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी क्षेत्रीय अधिकारी स्मिता ठाकूर यांनी कंत्राटी कामगार योगेश कोळीच्या मार्फत ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर रक्कम ३० हजारांवर आली. अखेर, मंगळवारी दुपारी नेरूळ येथील सिडकोच्या कार्यालयाबाहेर कोळी हा लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. त्यानंतर अधिकारी ठाकूर यांनाही ताब्यात घेण्यात आले.

हा सर्व भ्रष्ट कारभार जुईनगर पश्चिमेतील एका मंडळाच्या ४५ वर्षीय सचिवाने उघडकीस आणून सिडकोचा भ्रष्ट कारभार उघडीक आणला. या सचिवाने चार दिवसांपूर्वी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. सोमवारी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे व तडजोडीनंतर ३० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी सापळा रचून आरोपींना गजाआड करण्यात आले.

या प्रकरणाची चौकशी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अंतर्गत सुरू असून, सापळा कारवाई पोलीस निरीक्षक अरूंधती येळवे यांच्या पथकाने केली. यापूर्वीही पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सिडकोतील भ्रष्ट कारभार उघड केला होता.

नवी मुंबई, पनवेल परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या लाचखोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक उत्सवाला सुद्धा भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे चित्र या घटनेतून दिसून आले. एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अधिकारी अथवा एजंट शासकीय कामाकरिता लाच मागत असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.