लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल: तालुक्यातील करंजाडे नोडमध्ये राहणारा जयदीप मोरे हा गेट परीक्षेत अव्वल आला आहे. जयदीप हा विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला आयआयटीमध्ये एम.टेक्. करायचे आहे, म्हणून त्याने आयआयटी प्रवेशाची (गेट) नुकतीच परीक्षा दिली. या परीक्षेत जयदीपला ९३.६७ टक्के गुण मिळाले. जयदीपने राज्याचे नाव देशात उंच केल्याने त्याचे वडील सुधाकर आणि आई देवयानी यांनी अभिमान व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षांपासून जयदीप हा गेट परीक्षेसाठी अभ्यास करीत होता. त्याने महाविद्यालयातील मोबाइलवर येणाऱ्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तो गेली दोन वर्षे सर्वच समाजमाध्यमापासून दूर राहिला. अभियांत्रिकीमधील कृतज्ञता अभियोग्यता चाचणी म्हणून गेटची राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुणवत्ता पदव्युत्तर अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयांसाठी प्रवेश निश्चित केली जाते. जयदीपचे माध्यमिक शिक्षण पनवेलमधील सीकेटी शाळेत तर त्यानंतरचे अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण महात्मा महाविद्यालयात झाले. जयदीपने तिसऱ्या वर्षाचा अभ्यास करीत असताना यापूर्वी गेटची परीक्षा दिली होती. सध्या तो करंजाडे नोडमधील सेक्टर-४ येथे राहतो.
जयदीप देशात अव्वल आल्याचे समजताच त्याच्या घरी जाऊन करंजाडे नोड फ्लॅट ओनर वेल्फेअर असोसिएशनचे पनवेल अध्यक्ष चंद्रकांत महादेव गुजर व असोसिएशनचे सचिव सुभाष राळे यांनी जयदीपचे कौतुक केले. फार कठीण असणाऱ्या गेट परीक्षेत अव्वल येण्यासाठी त्याने जुन्या प्रत्येक वर्षाच्या नोट्स काढून अभ्यास केल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मोरे कुटुंबीय हे मूळच्या कोयना धरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी एक आहे.