पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील जमिनींच्या किमतींना सोन्याचा दर आला आहे. त्यामुळे जमिनींच्या मूळ मालकांना अंधारात ठेवून होत असलेल्या फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. अशाच एका प्रकरणात पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून पनवेलमधील मौजे तक्का गावात जमीन व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे येथील एरंडवणा येथे राहणारे ७० वर्षीय श्रीनिवास लेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीएनएस कलम ३३६ (३), ३१८ (४), ३४० (२) तसेच भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी लेले यांचे नाव वापरून २१ ऑक्टोबर २०२१ पासून बनावट कागदपत्रांची निर्मिती केली आणि त्या आधारे नगररचना विभागात अर्ज दाखल केला. हा अर्ज पनवेल शहरातील तक्का येथील सर्वेक्रमांक ३७१/३/१ आणि अंतिम भूखंड ४३२/०२ यांच्या मोजणीसाठी करण्यात आला होता. त्यानंतर या भूखंडाची विक्री व्यवहार पनवेलचे नील ग्रुपचे विकासक विलास कोठारी यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न झाला.

या प्रकरणात आरोपींनी बनावट अर्ज व स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून लेले यांचा वारसदार असल्याचा खोटा आभास निर्माण केला. जमीन मालकांच्या संमतीशिवाय किंवा सबळ पुराव्याशिवाय असे व्यवहार केल्याचे निष्पन्न झाल्याने जमीन फसवणुकीचे हे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून संबंधित कागदपत्रांची ई-साक्ष प्रणालीद्वारे पडताळणी केली जात आहे.पनवेल परिसरातील जमिनींच्या वाढत्या मागणीमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वीही न्यायालयीन कर्मचारी, वकिल आणि दलालांनी संगनमताने बनावट वारसदाखले तयार केल्याची प्रकरणे उघड झाली होती. आता समोर आलेल्या ताज्या घटनेमुळे मूळ जमीनमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीच्या व्यवहारात दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.