पनवेलमध्ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन; परिवहनचे कारवाईचे आश्वासन

‘महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास प्राधिकरण’ क्षेत्रामध्ये तीनआसनी रिक्षाचालकांनी मीटर प्रमाणे रिक्षा भाडे आकारावे, हा नियम मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. परंतु पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्हा परिषद व पनवेल नगर परिषद या दोनही स्वराज्य संस्थांचा कारभार असल्यामुळे या परिसरातील तीनआसनी रिक्षा या कधीच मीटरप्रमाणे धावल्या नाहीत. मात्र पाच महिन्यांपूर्वी पनवेल तालुक्याचे महापालिकेत रूपांतर झाल्यामुळे प्रवाशांच्या वर्षांनुवर्षांच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाला असून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना पनवेलचे परिवहन प्रादेशिक अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी येत्या बुधवारपासून प्रादेशिक परिवहन विभाग यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पनवेल तालुक्यामध्ये तीनआसनी रिक्षा चार हजार सातशे ७७ व्यवसाय करतात. तर सहाआसनी रिक्षा एक हजार दोनशे ५४ व्यवसाय करतात. पहिल्या दीड किलोमीटरसाठी सुमारे वीस रुपयांपर्यंतचे भाडे आकारावे असा नियम मीटरप्रमाणे चालणाऱ्या तीनआसनी रिक्षांना असताना पहिल्या एका किलोमीटरवरील भाडे सोडण्यासाठी सुमारे ४० रुपयांची दुप्पटीची भाडे आकारणी पनवेल परिसरात केली जाते. त्याचसोबत थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षा कधी स्वत:हून प्रवाशांनी हात केल्यावर देखील प्रवाशांपर्यंत जात नाहीत. प्रवाशी वृद्ध असले तरी रिक्षाचालक आपला थांब्यावरील नंबर सोडण्याच्या भानगडीत पडत नाहीत. रात्रीच्या वेळी तीन आसनी रिक्षाचालक कळंबोली मॅकडोनाल्ड, कळंबोली हायवे तसेच पनवेल रेल्वेस्थानक या पल्ल्यावर भाडय़ाच्या नावावर प्रवाशांची लुटमार करतात. यावेळी भाडय़ाच्या दराची सुरुवात शंभर ते दीडशे रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत होते, अशाही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कारवाईस गेल्यावर परवाने संपलेल्या काही रिक्षा धावतात त्यांच्याकडे बोट दाखवून आपल्यावरील कारवाईची वेळ मारून लावतात. त्यानंतरही अधिकारी कारवाईस ठाम राहिल्यास सहा आसनी रिक्षा पनवेल शहरीभागामध्ये व्यवसाय करतात याकडे बोट दाखवितात. त्यामुळे डिझेलच्या इंधनावर धावणाऱ्या या सहा आसनी रिक्षांवर महापालिका क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यास बंदी घालावी, अशी मागणी तीन आसनी रिक्षाचालकांकडून होते. परंतु परंपरेनुसार येथील प्रथा कोण बंद करणार, असा प्रश्न परिवहन व वाहतूक विभागातील  अनेक अधिकाऱ्यांना पडल्यामुळे ‘चलता है, चलने दो’, ही संस्कृती पनवेलमध्ये  रूजली आहे.

रिक्षाचालकांकडून पळवाटांचा आधार

पनवेलमध्ये आजही प्रवाशांना सहाआसनी रिक्षांचा धोकादायक प्रवास करावा लागतो. एका रिक्षामध्ये सुमारे दहा प्रवासी बसल्याशिवाय या सहा आसनी रिक्षा सुरूच होत नाहीत, अशी स्थिती आहे.समोरचे कायदा तोडतात, अशा नियमावर बोट ठेवून तीनआसनी रिक्षाचालकांनी वेळोवेळी आपले मीटर डाऊन केले नाहीत, हेच वास्तव आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना कायदा शिकवून आपली आजची कारवाई उद्यावर ढकलण्याची तसेच अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून कारवाईला स्थगिती देण्याची अनेक वेळा शक्कल लढवली जाते.

आयुक्तांकडून पुढाकार

पनवेल महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे कोणतेही धोरण ठरलेले नसल्याने पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी मागील आठवडय़ात याच कारणासाठी पालिका प्रशासन व परिवहन विभाग यांच्यात बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये तीनआसनी रिक्षाथांब्यांची गरज व थांबे किती असावेत याविषयीची चर्चा झाली. मीटरप्रमाणे रिक्षा चालव्यात, असाही आग्रह धरला. प्रादेशिक परिवहन विभागामध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे या विभागाला वाहतूक विभाग व स्थानिक पोलिसांचे सहकार्य घ्यावे लागणार असल्याने नवी मुंबईचे वाहतूक विभागाची मदत या मोहिमेत प्रशासनाला मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये लवकरच तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे व्यवसाय करतील यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. मनुष्यबळ कमी असले तरी आम्ही स्थानिक पोलीस व नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार आहोत. नियमाप्रमाणे येथे सर्वानी व्यवसाय करावा आणि प्रवाशांची सोय व्हावी यासाठी आमच्या विभागाचे अधिकारी मंगळवारपासून रस्त्यावर काम करताना दिसतील. एकाचवेळी सर्वच ठिकाणी कारवाई सुरू न ठेवता टप्याटप्याने पनवेल महापालिका क्षेत्रामधील विविध ठिकाणी या मोहिमा राबविण्यात येतील.

– लक्ष्मण दराडे, अधिकारी, पनवेल प्रादेशिक परिवहन.