पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्रभाग अधिकारी सदाशिव राम कवठे यांच्या निधनानंतर त्यांचा वारस मुलगा योगेश सदाशिव कवठे यांची अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर/नेटवर्किंग) या मंजूर व रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते योगेश कवठे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यांच्या आत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून योगेश यांना ही नियुक्ती देण्यात आली. शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणानुसार ही प्रक्रिया पार पडल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.राज्य शासनाने ९ जून रोजीच्या परिपत्रकानुसार सेवाविषयक बाबींशी संबंधित सुधारणा आणि दिडशे दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका प्रशासन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी प्रक्रियांमध्ये गतिमानता आणि सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात आली.

महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत विविध संवर्गातील २९ विविध कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. सदाशिव कवठे यांनी प्रभाग अधिकारी म्हणून महापालिकेत कर्तव्यदक्षतेने काम केले. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांच्या अभियंता असलेल्या वारस मुलास अवघ्या चार महिन्यांच्या आत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणानुसार पार पडली. यावेळी महापालिकेच्या मुख्यालय विभागाचे उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे आणि आस्थापना विभागप्रमुख कीर्ती महाजन उपस्थित होत्या. 

“सदाशिव कवठे हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबास न्याय मिळावा म्हणून महापालिकेने त्यांच्या मुलास नियमानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती देऊन मानवतेचे उदाहरण घालून दिले आहे.”कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका, मुख्यालय