पनवेल: महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वात उच्चांकी रक्कम आहे. १२०० कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी पालिका प्रशासनाचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त गणेश शेटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना व्यापारीवर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने हा उच्चांकी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली.पालिका क्षेत्रातील साडेतीन लाख करदात्यांपैकी अजूनही हजारो करदात्यांनी कर जमा केलेला नाही. त्यामुळे या करदात्यांना दंड लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेमध्ये आजपर्यंत ६४७ कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: भीषण अपघातात एकाचा मृत्यू, आरोपी फरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल असून न्यायालयाने आजपर्यंत करवसूलीसाठी पालिकेला कोणतीही स्थगिती दिली नसल्याने पालिकेने कर वसूलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील महिन्यात (मार्च) पालिकेचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, तत्कालिन उपायुक्त गणेश शेटे, मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक आयुक्त  स्वरूप खारगे, कर अधिक्षक महेश गायकवाड आणि सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही विविध प्रभाग अधिकारी यांनी मार्च महिना संपेपर्यंत १७ वेगवेगळी पथके तयार करुन या पथकांमधील कर्मचाऱ्यांनी करदात्यांकडून करवसूलीसाठी सुट्टी न घेता शनिवार ,रविवारी देखील कार्यालये सुरू ठेवली होती. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक करधारकांकडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली. मार्च महिन्यात ५२ कोटी रुपयांचा कर वसूल झाला. यामध्ये ३० मार्च या एकाच दिवशी १२ कोटीची विक्रमी वसुली झाली. तसेच रविवारी ३.६० कोटी रुपयांची उच्चांकी वसुली झाली आहे.