केंद्र, राज्य सरकारच्या योजना, सवलतींसह बचत गटांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरी आणि व्यवसायातील विविध संधी धुंडाळून त्या मिळविण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पनवेल महापालिकेच्या वतीने एक मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाइल अ‍ॅपमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, सवलती यासह महिला बचत गट, पालिका क्षेत्रातील रोजगार संधी यांची माहितीही मिळणार आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व स्थानिक संस्थांना अशा प्रकारे स्थानिक पातळीवर डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत.  असे मोबाइल अ‍ॅप तयार करणारी पनवेल पालिका पहिली पालिका ठरली आहे.

केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सर्व स्थानिक संस्थांना त्यांच्या क्षेत्रासाठी एक शहर उपजीविका केंद्राचे डिजिटल पर्याय उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र, राज्य आणि शहरातील सर्व सेवासुविधा योजना, सवलती नागरिकांना स्मार्ट फोनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य सरकारचे या संदर्भातील मोबाइल अ‍ॅप आणि संकेतस्थळ आहे. परंतु त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही.

पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शहरातील सर्वच प्रकारच्या उद्योग वाढीसाठी हातभार लावणाऱ्या घटकांची माहिती ‘एनयूएलएम सीएलसी मोबाइल अ‍ॅप’वर उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली. यात शहरातील उद्योजक, व्यावसायिक व्यवसायाची मोफत नोंदणी करू शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

या अ‍ॅपमध्ये नोकरीसाठी आयकॉनवर नोंद करता येणार आहे. ऑनलाइन खरेदी-विक्री या अ‍ॅपद्वारे करता येऊ शकणार आहे. शहरातील बचत गटांना समोर ठेवून हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. बचत गटांचा माल विकण्यासाठी त्यांना प्रदर्शन केंद्राचा आधार घ्यावा लागतो. या अ‍ॅपद्वारे ते घरगुती माल विकू शकणार आहेत. अशाच प्रकारे शेतीपूरक व्यवसायाची जाहिरातही करता येणार आहे. संस्था तसेच नागरिक आपल्या कार्यक्रमांची माहिती या अ‍ॅपद्वारे देऊ शकणार आहेत. ह्य़ा अ‍ॅपचा सर्वाधिक फायदा महाविद्यालयीन तसेच विद्यार्थी घेऊ शकणार आहेत.

विशेष म्हणजे या अ‍ॅपमध्ये नागरिकांना प्रेरणा देणारे समाजोपयोगी आणि प्रेरणा देणाऱ्या ध्वनिचित्रफिती पाहता येणार आहेत. राज्यातील घडामोडी बातम्यामुळे पाहता येणार असून शहरातील समस्या सेवाविषयी नागरिक थेट प्रश्न विचारू शकणार आहेत.

शहरातील प्रत्येक घटकासाठी हे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. – जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल पालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipality mobile app employment opportunity akp
First published on: 05-11-2019 at 01:25 IST