पनवेलमधील प्रवाशांना अविश्वसनीय वाटेल अशा म्हणजे किमान सात व कमाल १३ रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सोडणारी बससेवा आजपासून सुरू होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहनसेवेच्या (एनएमएमटी) माध्यमातून पनवेलकरांचा रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता पनवेल नगर परिषद कार्यालयासमोर या बससेवेचा शुभारंभाचा सोहळा होत आहे. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, माजी आमदार विवेक पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
७५ क्रमांकाची ही बस नगर परिषदेकडून रेल्वेस्थानकाच्या दिशेने निघेल. ही बस स्वामी नित्यानंद मार्गावरून धावणार आहे. त्यामुळे नगर परिषदेने या मार्गावरील खड्डे बुजविल्यास ही बस न अडखळता तेथून मार्गक्रमण करू शकेल, याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे.
याच मार्गावरील सहस्रबुद्धे रुग्णालयासमोर अनेक वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने तेथे नेहमी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. चालकांनी शिस्त बाळगल्यास तसेच तेथे वाहतूक पोलीस नेमल्यास हा प्रश्न निकाली निघू शकेल. पनवेल शहरातील चिंचोळे रस्ते हेही या बसपुढील मोठे आव्हान असेल.
सिटिझन्स युनिटी फोरम (कफ) ही संघटना आणि पोलीस उपायुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही सेवा साकारत आहे. कफच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित सरकारी कार्यालयात यासाठी अनेक खेटे मारले.