पनवेल : दिवा-रोहा पॅसेंजर पनवेल रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म व्यतिरीक्त मधोमध थांबल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही सेकंदच ही गाडी थांबणार असल्याने गाडी पकडण्यासाठी अनेकांना जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्म पाच व सहा येथून रुळ ओलांडून गाडी पकडली. या दरम्यान इतर कोणतीही जलद गाडी न आल्याने मोठी जीवित हानी टळली. नेमकी चूक कोणाची झाली याविषयी स्थानिक प्रबंधकांनी कोणतीही माहिती प्रवाशांना दिली नाही.

शनिवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पनवेल स्थानकात दिवा -रोहा पॅसेंजर या रेल्वेच्या मोटारमनने प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी जेथे मालगाडी ट्रेन उभ्या करतात तेथे (रेल्वेलाईन क्रमांक तीन) रेल्वे उभी केली. मोटारमनला चुकीचा सिग्नल दिल्याने ही घटना घडली की मोटरमनच्या चुकीने असे झाले याबाबत प्रवाशांना कोणीही रेल्वे प्रशासनाचे अधिकारी माहिती देत नव्हते. दिवा-रोहा पॅसेंजरची प्रतीक्षा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहावर उभे होते. नियमित याच प्लॅटफॉर्मवर ही गाडी येत असल्याने शेकडो प्रवाशी त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे होते. रेल्वेकडून गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे नियमित याच प्लॅटफॉर्मवर गाडी येणार असा अंदाज प्रवाशांनी बांधून ते रेल्वेची वाट पाहत होते. यामध्ये जेष्ठ नागरिक, बालक व अपंगांचा समावेश असल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी थांबविल्याने प्रवाशांनी गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मखालील रुळ ओलांडण्यासाठी एकच पळापळ केली. या दरम्यान इतर कोणतीही जलद रेल्वेगाडी न आल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा : लोकलवर बाटली फेकून मारणाऱ्याचा शोध सुरूच

या गाडीतून प्रवास करणारे नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी पनवेल स्थानकाचे उप प्रबंधकांना याबाबत विचारला. ही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणण्याची विनंती तेथील प्रवासी करत होते. मात्र प्रवाशांच्या विनंतीनूसार तत्काळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावणे शक्य नव्हते. तसेच पाच क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर वृद्ध आईला घेऊन प्रवास करणारे अपंग प्रवासी राहुल शिवहरे यांना तरी गाडीत बसविण्याची विनंती इतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

हेही वाचा : देवीच्या यात्रेला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी केली घरफोडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या प्रवाशांना शक्य होते त्यांनी मुलाबाळांना घेऊनच रुळ ओलांडून रेल्वे पकडली. मात्र शिवहरे यांच्या सारख्यांसाठी काय करणार असा प्रश्न उदभवल्याने रेल्वे प्रशासनाने गोंधळाची स्थिती निपटण्यासाठी व संतापलेल्या प्रवाशांना शांत करण्यासाठी रेल्वे पोलीसांच्या माध्यमातून अपंग प्रवासी शिवहरे व त्यांच्या आईला गाडीपर्यंत पोहचविण्यात आले. या घटनेबाबतची तक्रार जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विचारे यांनी रोहा रेल्वे प्रशासनाकडे केली.