उरण : प्लास्टर ऑफ पॅरिस या पर्यावरणाला घातक असलेल्या मूर्तींना पर्याय म्हणून कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात आलेल्या मूर्तींना मागणी वाढली होती. मात्र पुन्हा एकदा प्लास्टरच्या मूर्तींना परवानगी दिल्याने जवळपास ७० टक्के मूर्तींची मागणी घटली आहे. यात वर्षोनी वर्षे प्लास्टर च्या मूर्तींचा वापर करणाऱ्या गणेशोत्सव मंडळाकडून ही मागणी होती. अशी माहिती जेष्ठ मूर्तिकार मोरेश्वर पवार यांनी दिली आहे.
सरकार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता दरवर्षी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जाहिराती आणि विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या प्लास्टरला पर्याय असलेल्या पारंपरिक शाडूच्या मूर्ती आणि नवी पर्याय असलेल्या कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी या शासकीय हव तसे लक्ष दिल जात नाही.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई तसेच नवी मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच खाजगी घरगुती गणेशभक्तानी लगद्याच्या मूर्तींना पसंती दिली होती. कागदाच्या लगद्याच्या मूर्ती तयार करण्यासाठी माती आणि प्लास्टर पेक्षा अधिक वेळ लागतो. त्याचप्रमाणे मागणी कमी असल्याने या मूर्तीच्या किमती या दोन्हीच्या मूर्ती पेक्षा अधिक दर आकारला जात आहे. त्यामुळे ही मागणीही कमी आहे. मात्र पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्यात आली आहे. त्याचा चांगला परिणाम झाला आहे. गणेशभक्ताकडून याची अंमलबजावणी म्हणून महाग असतानाही शाडूच्या मूर्तींनाही मागणी वाढली होती. तर दुसरीकडे वजनाने हलक्या आणि पूर्णपणे पर्यावरण पूरक म्हणून गणल्या गेलेल्या कागदाच्या लगद्याच्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे.
जासई येथील प्रसिद्ध मूर्तिकार व जे जे स्कुलचे प्राध्यापक मोरेश्वर पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार करीत आहेत. त्यांच्याकडे १ फुटा पासून ते दहा फुटा पर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. यावर्षी आशा प्रकारच्या गणेशमूर्तीना चांगली मागणी आली होती. मात्र या अचानकपणे प्लास्टरच्या बंदीचा निर्णय मागे घेतल्याने जवळपास ७० टक्के मागणी कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
लगद्याच्या मूर्तीचे पूर्णपणे विघटन : कागद आणि गम यांचा वापर व पाण्यात विरघळून जाणारे रंग यामुळे या मूर्तींचे पाण्यात पूर्णपणे विघटन होऊन पर्यावरणाचे ही रक्षण होत असल्याचा दावा मूर्तिकाराकडून केला जात आहे.