शहरामध्ये दुचाकीवरून गस्त घालणाऱ्या पनवेल व उरणच्या साठ पोलीस बीट मार्शलची परिमंडळ २ च्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी मंगळवारी हजेरी घेतली. या हजेरीनंतर शिपायांच्या तुकडीला एकत्रित गस्त घालण्यासही सांगण्यात आले. अशा प्रकारे सर्व गस्त पोलीस शिपायांनी एकत्रित गस्तफेरी काढण्याची पनवेलमधील ही पहिलीच वेळ होती. वाढत्या घरफोडय़ा रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

पनवेल व उरण या दोन्ही विभागांचे काम साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी हेच पाहतात. पनवेल व उरण हे क्षेत्र नवी मुंबईच्या परिमंडळ २ मध्ये येते. सध्या दिवसा व रात्री वाढलेल्या घरफोडय़ा रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे व सूर्यवंशी यांनी पोलीस बीट मार्शलवर लक्ष केंद्रित केले आहे. या पाश्र्वभूमीवर पनवेल व उरण विभागांत दुचाकीवरून गस्त घालणाऱ्या ६० बीट मार्शलना एकत्रित बोलावण्यात आले.

या पोलीस शिपायांनी या वेळी वरिष्ठांसमोर अनेक अडचणी मांडल्या.

सरकारी दुचाकींची कमतरता आणि गस्तीसाठी लागणारे पेट्रोल या प्रमुख समस्यांचा त्यात समावेश होता.

पनवेल व उरणमध्ये दहा पोलीस ठाणी असून प्रत्येक ठाण्यात एकच दुचाकी आहे. त्यामुळे वीस पोलीस शिपाई हे स्वत:च्या दुचाकी वापरतात. गस्त घालणाऱ्या ३० दुचाकींमध्ये पोलीस गुप्त निधीतून रोज ४ लिटर पेट्रोल देण्याचे वरिष्ठांनी मान्य केले.