पनवेल : खांदेश्वर आणि नवीन पनवेल वसाहतीमध्ये पायी चालणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. ५ फेब्रुवारीला एकाच दिवशी तीन जबरी चोरीच्या घटनेनंतर पुन्हा १४ फेब्रुवारीला पुन्हा पायी चालणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धेला लुटीचा सामना करावा लागला आहे. ९ दिवसात लुटीच्या चार घटनांमुळे पायी चालणारे रहिवासी भितीच्या सावटाखाली आहेत.

खांदेश्वरमधील ५ फेब्रुवारीला ४४ वर्षीय महिला सेक्टर १ मधील शिवकृपा अपार्टमेन्ट समोरील रस्त्यावर पाळीव श्वानाला घराबाहेर फीरवत असताना रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. या महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांना पोलीस ठाण्यात त्याच चोरट्यांनी अजून दोघांना लुटल्याचे समजले. त्यापैकी दुसऱ्या घटनेत सेक्टर ४ मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी शिवा कॉम्पलेक्स येथे चोरली. तर तीसऱ्या घटनेत ३७ वर्षीय व्यक्तीला त्याच चोरट्यांनी पुमा शोरुमसमोरील रस्त्यावर लुटल्याचे पोलीस ठाण्यात समजले. या सर्व घटनांची एकत्रित नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनांनंतर खांदेश्वर आणि नवीन पनवेल परिसरात सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असताना दोन दिवसांपूर्वी (१४ फेब्रुवारी) नवीन पनवेल येथील सेक्टर १९ येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धा पायी चालत असताना एक चोरटा चालत येऊन त्याने वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तेथून पोबारा केला. ही घटना सेक्टर १२ येथील रस्ता क्रमांक १६ येथे सकाळी साडेअकरा वाजता घडली.

हेही वाचा – जेएनपीएमध्ये शेतकऱ्यांच्या निर्यात कृषीमालासाठी केंद्र उभारणार

हेही वाचा – नवी मुंबई : बेकायदा झोपड्यांचा विळखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९ दिवसांत घडलेल्या चार घटनांमुळे खांदेश्वर आणि नवीन पनवेल या वसाहतींमधील पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटना दिवसा व सायंकाळच्या घडल्याने पोलिसांचा चोरट्यांवरील धाक कमी झाला की काय असा प्रश्न रहिवाशांकडून विचारला जात आहे. या परिसरातील पोलिसांची गस्त तसेच शहरातील मुख्य मार्गावरील नाकाबंदीची अधिक आवश्यकता निर्माण झाली आहे. सिडको मंडळाने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तरीही पोलीस अद्याप चोरट्यांचा शोध लावू शकले नाहीत.