नवी मुंबई : आमच्यासाठी राष्ट्रनीती हाच राजकारणाचा पाया आहे. दुसऱ्या बाजूला देशातील काही राजकीय विचारधारा जनतेच्या नव्हे तर सत्तेच्या सोयीसाठी काम करतात अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मुंबईसारख्या शहरात प्रत्येक मिनिट मोलाचा आहे. तिथे मेट्रो प्रकल्पासाठी चार ते पाच वर्षांची वाट पाहावी लागली, हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही, अशी टीका त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली. त्याच वेळी नवी मुंबई विमानतळ विकसित भारताचे प्रतीक आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री के.आर.नायडू, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले उपस्थित होते.
मेट्रोच्या भूमिपूजनानंतर लाखो मुंबईकरांना प्रवासाचा त्रास कमी होईल अशी आशा होती. मात्र सत्ताबदल झाल्यावर त्यांनी हे काम थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले असा आरोप पंतप्रधानांनी केला. आमच्यासाठी पायाभूत सुविधांवर खर्च होणारा प्रत्येक पैसा हा देशवासीयांच्या सोयीसुविधा आणि सामर्थ्य वाढवण्याचे साधन आहे. राजकारणाचा केंद्रबिंदू सत्ता नव्हे तर राष्ट्राचा उत्कर्ष असायला हवा, असे मोदी म्हणाले. भाषणात त्यांनी भूमिपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांचेही स्मरण केले. शेतकरी आणि समाजासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार मोदींनी काढले.
मुंबईकरांना ज्याची प्रतीक्षा होती ती सुविधा आज मिळाली आहे. गेल्या ११ वर्षांत आम्ही नागरिकांचे राहणीमान सुलभ करण्यावर भर दिला आहे. रेल्वे, रस्ते, विमानतळ, मेट्रो, इलेक्ट्रिक बस, अटल सेतू, कोस्टल रोड या सर्वांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करण्यात आली आहे. आम्ही सर्व वाहतूक साधनांना एकत्र आणत आहोत, ‘एक राष्ट्र – एक गतिशीलता’ या दिशेने पावले टाकत आहोत असे त्यांनी नमूद केले.
मुंबईवरील हल्ल्यावरून काँग्रेस लक्ष्य
२००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या कचखाऊ धोरणाबाबत गृहमंत्रीपदी असलेल्या त्यांच्याच एका ज्येष्ठ नेत्याने मुलाखतीत कबुली दिली. भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते. पण परकीय दबावामुळे सरकारने सैन्याला रोखले. हा निर्णय कोणी घेतला? देशाच्या सुरक्षेशी कोणी तडजोड केली, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी पंतप्रधानांनी केली. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढले असा आरोप पंतप्रधानांनी केला. पण आजचा भारत वेगळा आहे. तो घरात घुसून हल्ला करून शक्तिशाली प्रत्युत्तर देतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाने भारताची ताकद पाहिली, असेही नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.