नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार तर मानलेच. शिवाय एका बैठकीत सात एनओसी मोदींमुळे कशा मिळाल्या तो किस्साही सांगितला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. गेल्या दहा वर्षांपासून ज्या गोष्टी आम्ही सांगतो आहोत त्या गोष्टी आज लोकार्पित होत आहेत ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. आज झालेलं विमानतळ हे नवभारताचं प्रतीक आहे. या विमानतळाची संकल्पना नव्वदीच्या दशकातली होती. अनेक वर्षे आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तेव्हा एक फलक लागलेला असाचाया की नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार. पण पुढे काहीही घडायचं नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदींनी एकाच बैठकीत सात एनओसी मिळवून दिल्या आणि विमानतळाचं काम सुरु झालं-फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यावेळी मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं तेव्हा प्रगती मध्ये नवी मुंबई विमानतळ घ्यावं अशी विनंती आम्ही मोदींना केली. मोदींनी आमची विनंती मान्य केली त्यानंतर दहा वर्षांमध्ये आठ एनओसी अशा होत्या ज्या या विमानतळाची सुरुवात करण्यासाठी हव्या होत्या. पण त्या मिळत नव्हत्या. मोदींनी प्रगतीची पहिली बैठक घेतली तेव्हा सकाळपर्यंत सांगितलं की आता आम्हाला सात एनओसी मिळाल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारलं की आठव्या एनओसीचं काय? त्याला एक महिन्याची नोटीस होती. ती निघाली होती. पंधराव्या दिवशी ती एनओसी आली आणि त्यानंतर जे दहा वर्षे झालं नव्हतं ते मोदींच्या एका बैठकीत झालं आणि अत्यंत सुंदर असं विमानतळ आपण या ठिकाणी बांधलं. ९ कोटी प्रवासी क्षमता असलेलं हे विमानतळ आहे. इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे विमानतळ आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात हे विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबई विमानतळाहून वॉटर टॅक्सीने गेट वेला जाता येणार-फडणवीस

महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता हे विमानतळ ठेवतं. मोदींच्या नेतृत्वात अटल सेतूही तयार झाला आहे. तसंच हा पहिला एअर पोर्ट असेल ज्यात वॉटर टॅक्सी मिळणार आहे. इथल्या वॉटर टॅक्सीत बसून आपल्याला थेट गेटवे ऑफ इंडियाला जाता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी असेल. तसंच चाळीस किमीची भूमिगत मेट्रो ही देखील मोदींच्या आशीर्वादाने अडथळे पार करत तयार केली. आपण या मेट्रोमुळे दक्षिण आणि उत्तर मुंबई जोडू शकलो. हरित लवाद, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या अडचणी येऊनही आम्ही हे काम पूर्ण करु शकलो. कारण नरेंद्र मोदी आमच्या पाठिशी होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.