ऐरोली येथील एका हॉटेल व्यावसायिकाला घरी सोडण्याच्या बहाण्याने चार दिवस पाळत ठेवून चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या रिक्षाचालकाला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

हॉटेल व्यावसायिक असणारे नारायण यादव यांना सूरज पवार हा रिक्षाचालक त्यांच्या ऐरोली येथील घरी सोडत असे. यादव हे हॉटेल बंद करून घरी परतत असल्याने त्यांच्याजवळ मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम असे. ही रोकड पाहून पवारचे डोळे फिरले. त्याने कैलास धिडोळे, मोहन थापा व राज अधिकारी या मित्रांच्या मदतीने यादव यांना लुटण्याचा कट रचला. बुधवारी रात्री यादव नेहमीप्रमाणे पवारच्या रिक्षात बसले. मात्र पवारने त्याच्या तीन साथीदारांसह यादव यांना पटनी कंपनीजवळ नेऊन त्यांच्याकडील ४३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाइल लुटला. या चौघांनी त्यांच्यावर चाकूचे वारही केले आणि त्यांना ऐरोली येथे सोडून दिले. यादव यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास करीत या चौघांना अटक केली व त्यांच्याकडून मोबाइल तसेच पंधरा हजार रुपये हस्तगत केले.