उरण : शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील गुंतवणूकदारांनी आपले पैसे वसुलीसाठी १६ जुलैला एजंटांच्या घरी जाण्याचा निर्णय समाजमाध्यमात जाहीर केल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी उरण पोलिसांनी या परिसरात रविवारी जमावबंदीचे १४४ कलम लागू केला. त्यासाठी कोप्रोली आणि पिरकोन सह अनेक गावात बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात केला होता. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचे रूप आले होते.

उरणच्या पिरकोन येथील सतीश गावंड आणि त्याच्या साथीदारांनी ५० दिवसांनी दुप्पटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडुन शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे न मिळाल्याने गुंतवणुकदारांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सतीश गावंड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीनावर सुटका झाल्यानंतर दुप्पटीने पैसे मिळतील अशी भाबडी आशा गुंतवणूकदारांना लागुन राहिली होती. चिटफंड प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या एजंटकडून पैसे परत करण्याच्या सातत्याने तारखा जाहीर करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई: चिकन दुकानासमोर रांगा, श्रावण आला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पैसे परत करण्याच्या तारखांवर आता गुंतवणूकदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे १६ जुलै रोजी गुंतवणूकदारांनी कोप्रोली नाक्यावर उपस्थित राहून एजंटांच्या घरी जाऊन पैसे वसूल करण्याचे आवाहन समाजमाध्यमातून करण्यात आले होते. याला पोलिसांनी आक्षेप घेत मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कायदा हातात न घेता संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात.सनदशिल मार्गाचा अवलंब करावा. अन्यथा बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी पत्रक काढून दिला होता.