निर्णय रद्द करण्यासाठी शिवसेना-भाजप आग्रही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आठवडय़ातून एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावर नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना आता राजकीय पक्षही त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. ही पाणीकपात करून नवी मुंबईकरांचे पाणी अन्य शहरांकडे वळवण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपने केला आहे तर शिवसेनेनेही या पाणीकपातीला विरोध करत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.  नवी मुंबई महापालिकेचे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असून गतवर्षी डिसेंबपर्यंत झालेल्या पावसामुळे त्यात पुरेसा पाणीसाठा असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगितले जात होते. असे असताना सोमवारी अचानक पालिका प्रशासनाने पत्रक काढून प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर केले. धरणातील पाणीसाठय़ाचे येत्या पावसाळय़ापर्यंत नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याला भाजपने आक्षेप घेतला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना ही कपात करण्याचे कारण काय, असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. मोरबेतून मिळणारे पाणी अन्य शहरांकडे वळवण्याचा डाव असल्याचा आरोपही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. 

एमआयडीसीकडून नवी मुंबईतील काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रकारे आसपासच्या काही शहरांतील भागांनाही एमआयडीसी पाणीपुरवठा करते. त्या भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबईतील पाणीपुरवठा एमआयडीसीने कमी केल्याचा आरोप भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी केला. हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पाणीकपातीवर राजकारणनिर्णय रद्द करण्यासाठी शिवसेना-भाजप आग्रही त्यांनी दिला आहे. या मुद्दय़ावर शिवसेनेनेही आग्रही भूमिका घेत पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली नेरुळमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शहर अभियंता संजय देसाई यांची यासंदर्भात भेट घेतली. यावर्षी पर्जन्यवृष्टी मोठय़ा प्रमाणात झाली असताना पाणीकपात करून नागरिकांची गैरसोय केली जात असल्याचे नाहटा यांनी या वेळी सांगितले. पालिका प्रशासनाने मात्र या पाणीकपातीचे समर्थन केले आहे. पाणीपुरवठय़ाच्या योग्य व सुनियोजित नियोजनासाठीच पाणीकपात करण्यात येत आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा होणाऱ्या प्रत्येक विभागात आठवडय़ातून एकच दिवस संध्याकाळी पाणीकपात असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

पाणीकपात योग्य की अयोग्य?

  • गतवर्षी पावसाळय़ाचा मुक्काम डिसेंबपर्यंत होता. त्यामुळे मोरबे धरणात मुबलक जलसाठा आहे. नवी मुंबईकरांना येत्या २० सप्टेंबपर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पालिका प्रशासनानेच म्हटले होते. असे असताना पाणीकपात करण्यात आली आहे.
  • नवी मुंबई शहरातील काही भागांत आधीच अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. एमआयडीसीकडून नवी मुंबई पालिका क्षेत्रात देय पाणीपुरवठा पूर्णपणे होत नाही. दिघा, ऐरोली, घणसोली हे भाग एमआयडीसीच्या पाणीपुरवठयावर अवलंबून असल्याने या भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना वारंवार करावा लागतो आहे.

मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असताना पाणीकपात कशासाठी करता? एमआयडीसीकडून येणारे हक्काचे पाणी मिळवता येत नाही. एमआयडीसीकडून पाणी का मिळत नाही त्याचा शोध घ्यावा. यामध्ये प्रशासनाचे ढिसाळ नियोजन दिसत असून पाणीकपात तात्काळ रद्द करा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू.

– संदीप नाईक, माजी आमदार 

पालिकेने पाणीकपात सुरू केली असली तरी कोणाच्या सांगण्यावरुन पाणी दुसऱ्या शहरात पळवले जाते हा आरोप चुकीचा आहे. शिवसेनेच्या वतीनेही पाणीकपात रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

– विजय चौगुले, माजी विरोधी पक्षनेता

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics watershed shiv sena bjp insists cancel decision ysh
First published on: 23-02-2022 at 00:02 IST