सिडकोकडून दोन हजार लाभार्थ्यांना चावी
विकास महाडिक
नवी मुंबई : देशामध्ये एकाच वेळी सात हजार घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सिडको पहिल्यांदाच राबवत असून आतापर्यंत दोन हजार घरांचा प्रत्यक्षात ताबा देण्यात आला आहे. कोविड काळात ही प्रक्रिया राबविली जात असून सर्व उपाययोजनांसह दिवसाला केवळ १०० लाभार्थीच्या घरांची नोंदणी केली जात आहे. त्यासाठी सिडकोचे कर्मचारी व अधिकारी दहा तासांपेक्षा जास्त सेवा देत आहेत.
प्रतिकूल परिस्थिती असताना ग्राहकांना ताबा देण्यासाठी कंत्राटदारही कटिबद्ध आहेत. मात्र या सर्व कामाचे कौतुक करण्याऐवजी टीका केली जात असल्याने वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया सिडकोच्या पणन विभागाने व्यक्त केली आहे. जुलैपासून सुरू झालेली ही ताबा प्रक्रिया येत्या चार महिन्यांत पूर्ण केली जाणार असून त्यासाठी आता नोंदणीसाठी कर्मचारी अधिकारी वर्ग वाढविला जाणार असल्याचेही या विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात येणाऱ्या दिवाळी या महासणाच्या काळात सिडकोची सात हजार ४०० ग्राहकांना हक्काचे घर देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सर्वासाठी घर या योजनेअंर्तगत सिडकोने महागृहनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत केवळ एक लाख तीस हजार घरे बांधणाऱ्या सिडकोने दोन वर्षांत २४ हजार घरांचे प्रत्यक्षात काम सुरू केले असून ताबा देण्याची प्रक्रिया राबवली आहे. याशिवाय लवकरच सिडको आणखी चाळीस हजार घरांचे बांधकाम हाती घेणार आहे. त्याअगोदर या २४ हजार घरांची विक्री प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या ताबा प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. कोविडकाळात अनेक नोकरदारांचे रोजगार गेले आहेत तर काही जणांच्या वेतनात कपात झालेली आहे. त्यामुळे अनेकांनी सिडकोच्या सोडतीत लागलेल्या घरांवर पाणी सोडले आहे. काही जणांनी कमी अनामत रक्कम म्हणून भरलेला अर्ज बाद झाल्याने छाननीत घरे अपात्र ठरण्याची संख्या सात हजारांच्या घरात गेली आहे. सिडकोने कोविड काळात चार वेळा पैसे भरण्यास मुदतवाढ दिली आहे. हजारो ग्राहकांचे विलंब शुल्क माफ केले आहे. जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या ताबा प्रक्रियेसाठी लाभार्थीच्या घरांचे सर्व हप्ते व देखभाल खर्च भरलेल्या सहा हजार लाभार्थीना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी निवारा केंद्रात नोंदणी व करारनामा प्रक्रिया करण्यासाठी कर्मचारी वर्ग लवकरच वाढविला जाणार आहे.
ताबा देण्यात आलेल्या ग्राहकांच्या घरांबद्दल काही तक्रारी आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी घरांच्या ठिकाणावर एक तक्रार पुस्तिका ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन तक्रार सुविधा आहे. समस्या सोडविण्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्याचा आधार न घेता काही लाभार्थी घरांबाबत अतिशय क्षुल्लक तक्रारी करीत आहेत. या तक्रारी सोडविण्यास सिडको कटिबद्ध आहे पण महाताबा प्रक्रिया राबविताना काही त्रुटी राहणार. त्या सोडविल्या जातील पण त्यासाठी सिडकोची प्रतिमा मलिन करण्याचे काम काही मंडळी करीत असल्याची कैफियत पणन विभागाने मांडली.
किरकोळ तक्रारी
ताबा देण्यात आलेल्या ग्राहकांच्या घरांबद्दल काही तक्रारी आहेत. मात्र यात किरकोळ तक्रारींचा समावेश असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.
पावसात नळजोडणी
घणसोली येथील पामबीच मार्गावर सिडकोची ही घरे आहेत. या ठिकाणच्या लाभार्थीना देखील घरांचा ताबा देणे सुरू आहे. मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात या गृहसंकुलासाठी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोने कंत्राटदाराच्या माध्यमातून पूर्ण केली. त्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मोठे सहकार्य केले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असताना चार ते पाच फुटांचे खड्डे खोदून ही पाणी जोडणी देण्याचे काम सिडकोने केले. लाभार्थीना घरांचा ताबा देताना या सुविधा देणे क्रमप्राप्त असल्याची जाणीव ठेवून भर पावसात हे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती देखील या विभागाने दिली.