करोनाचा एकही रुग्ण नाही; दररोज ३०० ते ४०० बाह्यरुग्ण

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : सर्वसामान्य कुटुंबांसाठी आधार असलेले नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय आता आठ महिन्यांनंतर पुन्हा पूर्ण क्षमतेने सामान्यांना आरोग्यसेवा पुरविणार आहे. गेले आठ महिने या रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे या इतर रुग्णांच्या आजाराची परवड सुरू होती.

नवी मुंबई महापालिकेचे ३०० खाटांचे हे रुग्णालय असून करोनाच्या प्रादुर्भावानंतर पूर्णत: करोना रुग्णालय करण्यात आले होते. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे हे रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांसाठी सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून तसा निर्णय घेत या रुग्णालयात नवीन करोना रुग्णांना प्रवेश बंद केला होता. सामान्य आजारांसाठीच्या सुविधांची सुरुवात करीत १७५ खाटांच्या या रुग्णालयात प्रथम ९० खाटांची व्यवस्था केली होती. टप्प्याटप्प्याने करोना रुग्णसेवा बंद करण्यात आली. या रुग्णालयात अत्यवस्थ करोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यामुळे प्रथम प्राणवायूची गरज असलेल्या खाटांवर प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर अतिदक्षता उपचार बंद करण्यात आले. दिवाळीअगोदर या रुग्णालयात फक्त करोनाचा एकच रुग्ण शिल्लक होता. आता एकही रुग्ण शिल्लक न राहिल्याने पालिकेने हे रुग्णालय पुन्हा सामान्य आजारांच्या रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे जाहीर केले आहे. सद्य:स्थितीत या रुग्णालयात सामान्य आजारांच्या १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनापूर्वी या रुग्णालयात दररोज बाह्यरुग्ण विभागात १६०० पर्यंत रुग्ण येत होते. आता नुकतीच ही सेवा सुरू झाल्याने बाह्यरुग्ण विभागात दररोज ३०० ते ४०० रुग्ण येत आहेत.  प्रसुती विभाग, औषध विभाग तसेच बालरोग विभाग सुरू करण्यात आला आहे.  शस्त्रक्रिया विभागही लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे वाशी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले.

वाशीतील ३०० खाटांचे रुग्णालय पूर्णत: करोना रुग्णालय केले होते; परंतु आता पुन्हा शहराच्या महत्त्वपूर्ण रुग्णालयात पूर्वीप्रमाणे सामान्य आजारांच्या रुग्णावरील आरोग्यसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर हे रुग्णालय पूर्णत: सामान्य रुग्णालय करण्यात आले आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका