विकास महाडिक
यंदा मोसमी पावसाचे लवकर आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची तारांबळ उडाली आहे. सर्वसाधारपणे मे अखेपर्यंत पावसाळा पूर्व कामांचा निपटारा करण्याची पद्धत स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे, पण यंदा पाऊस लवकर येणार असल्याने ही मुदत २० किंवा २५ मे ठरविण्यात आलेली आहे.
राज्यातील इतर शहरांपेक्षा नवी मुंबईत पावसाच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते असे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. नवी मुंबई शहर हे खाडी किनारच्या खार जमिनींवर मातीचा भराव टाकून वसविण्यात आले आहे. त्यामुळे या शहरात भरती आणि मुसळधार पाऊस अशी स्थिती असल्यास पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याचे यापूर्वीच्या अनुभवावरुन लक्षात येत आहे. सिडकोने हे शहर वसविण्यापूर्वी या भरतीच्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी नेदरलॅन्डच्या धर्तीवर उघाडी पध्दतीचे धारण तलाव बांधलेले आहेत. या तलावात मागील पंधरा वर्षांत मोठय़ा प्रमाणात गाळ साचला असून तो काढण्याची गरज आहे.
वाशी येथील धारण तलावातील गाळ पालिकेने काही वर्षांपूर्वी काढला होता. या तलावात खारफुटी नसल्याने पालिकेला ते शक्य झाले. अनेक दिवस हा गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होती. शेकडो टन गाळ काढल्यानंतर या तलावात पाऊस व भरतीचे पाणी नियंत्रित करता आले आहे पण अशा प्रकारचे अनेक धारण तलाव गाळांनी साचलेले आहेत. सागरी नियंत्रण मंडळाकडे हे धारण तलाव स्वच्छ करण्याची परवानगी मागण्यात आली आहे पण ती पावसाळा जवळ आला तरी मिळालेली नाही. त्यामुळे धारण तलावाच्या आजूबाजूच्या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर सागरी मंडळ हा गाळ काढण्याची परवानगी देईल का असा सवाल नवी मुंबईकरांचा आहे.अशा प्रकारचे धारण तलाव आणि त्याच्या आजूबाजूला लोकवसाहत अशी रचना राज्यात इतर ठिकाणी नाही. त्यामुळे गेल्या वर्षी चिपळूण, महाड मध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परस्थिती नंतर या दोन शहरात कोटय़वधी रुपये खर्च करुन वाशिष्ठ व सावित्री नदीतील गाळ काढण्याचे काम गेली आठ महिने करण्यात आलेले आहे. नवी मुंबईच्या जवळून नदी वाहत नसली तरी अरबी समुद्राचा एक भाग असलेली ठाणे खाडी असून साठ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा खाडी किनारा या शहराला लाभलेला आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची नैर्सगिक आपत्ती निर्माण होण्यापूर्वी सिडकोने तयार केलेले हे धारण तलाव स्वच्छ होणे आवश्यक आहेत. हे तलाव स्वच्छ करता येत नसल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गधी तसेच डासांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे धारण तलाव तसेच पारसिक
डोंगराच्या कुशीतून निघणारे पावसाळी नाले जे खाडीला जाऊन मिळतात हे दरवर्षी स्वच्छ करणे गरजेचे आहे. पालिकेने सध्या सर्व गटारे
स्वच्छ करुन घेतलेली आहेत पण या गटारांच्या जवळच सुकण्यासाठी ठेवण्यात आलेला गाळ, चिखल कधी उचलणार असा प्रशद्ब्रा नागरिकांचा आहे कारण पाऊस लवकर सुरु झाल्यास हा गाळ पुन्हा त्या गटारात जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पुन्हा हा गाळ काढण्यासाठी पालिकेची तिजोरी खाली करण्याची जुनी पद्धत प्रचलित आहे.
सिडकोने वसविलेले शहराची देखभाल आणि दुरुस्ती करणे हे पालिकेचे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे काम आहे. एमआयडीसी क्षेत्रातून दोन हजार कोटी रुपयांचा कर येत असल्याने पालिकेने काही नवीन प्रकल्प राबविले ही एक चांगली बाब आहे पण या प्रकल्पांच्या आडून तेवढाच भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. सिडकोने आणि नंतर पालिकेने काही ठिकाणी भुयारी मार्ग बांधलेले आहेत. या भुयारी मार्गात पावसाळय़ात पाणी साचणार हे सांगण्यास कुण्या स्थापत्य शास्त्रातील निष्णांत अभियंत्याची गरज नाही,
पण गेली तीस वर्षांत पालिकेने यावर कायम स्वरुपी तोडगा काढलेला नाही. त्यामुळेच ऐरोली येथील टी जंक्शनजवळ भर पावसात चार ते पाच फूट पाणी साचत असल्याचा अनुभव गेली अनेक वर्षे ऐरोलीकर घेत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबा तर होता पण डोंगरातून मातीचा गाळ येऊन रस्त्याच्या कडेला या गाळाचा थर पुढील अनेक दिवस पाहावा लागत आहे. कोपरखैरणे, रबाले, वाशी, नेरुळ, येथील भुयारी मार्गाची वेगळी कहाणी नाही. हे पाणी काढण्यासाठी पालिकेने यंदा अतिरिक्त पंप तयार ठेवले आहेत. यावरुन या समस्येची तीव्रता लक्षात येते पण यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यात पालिकेला अपयश आलेले आहे. पाणी साचण्याची ठिकाणी निश्चिात करण्यात आली असून त्या ठिकाणी असे पंप ठेवले जाणार आहेत. दरवर्षी पाऊस नित्य नियमाने येत असताना अशा पाणी साचण्याच्या ठिकाणांवर कायमचा तोडगा न काढण्यामागे कंत्राटदारांचे चांगभलं करण्याचा हेतू पालिकेच्या अभियंत्यांचा असावा का अशी शंका घेण्यास वाव आहे. देखभाल आणि दुरुस्ती या वार्षिक आणि पंचवार्षिक कंत्राटामध्ये गेली अनेक वर्षे काही कंत्राटदार ठाण मांडून बसलेले आहेत. पालिकेने या कंत्राटदारांना दत्तक घेतल्याचे चित्र आहे. तळी राखील तो पाणी चाखेल या म्हणी प्रमाणे पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या वरदहस्तावर ही कंत्राटे गेली अनेक वर्षे बिनबोभाट दिली जात आहेत.
साफसफाई व उद्यान कंत्राटांवरून ही बाब लक्षात येण्यासारखी आहे. मान्सून पूर्व कामासाठी दरवर्षी कोटय़ावधी रुपयांची तरतूद केली जात असून दरवर्षी हा निधी वापरला जात आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. त्यामुळे जलमय नवी मुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंगराच्या पायथ्याशी दगडखाणींच्या कृपेने असलेल्या काही वसाहती स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत तर काही वसाहती आजही भीतीच्या सावटाखाली आहेत. डोंगर आणि खाडी यांच्यामधील भूभागावर नवी मुंबई शहर वसविण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने पाण्याचा धोका जास्त आहे.
शहरात अतिवृष्टी काळात अनेकांचे संसार वाहून गेल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याशेजारी असलेल्या या शहराचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे. नवी मुंबई विमानतळाच्या आसपास असलेल्या काही गावात मागील वर्षी दहा फूटापेक्षा पाणी साचले होते. यासाठी सिडकोने पुण्यातील एका संस्थेच्या माध्यमातून अहवाल तयार केला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे विमानतळासाठी भराव करण्यात आला. शंभर वर्षांत या गावात पाणी साचणार नाही असा दावा केलेल्या या चार गावात गेली दोन वर्षे पाणी साचत आहे.
नवी मुंबईत त्या चार गावांइतकी वाईट स्थिती नसली तरी होणारी बेकायेदशीर बांधकामे, सिमेंट कॉँक्रीटीकरण, डोंगराच्या पायथ्याशी उभ्या राहणाऱ्या वसाहती यामुळे नवी मुंबई मध्ये इतर शहरांपेक्षा लवकर पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याची पालिकांनी वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे.