स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई महापालिकेची ‘ये कवितेची नगरी’ संकल्पना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई</strong> :  करोनाची तिसरी लाट आल्यामुळे मागे ठेवण्यात आलेले स्वच्छ भारत अभियानाने पुन्हा जोर धरला आहे. शहरातील भिंती रंगविण्यास सुरुवात झाली आहे. यंदा या रंगरंगोटीमध्ये भारतातील नामवंत कवी आणि त्यांच्या प्रसिद्ध कविता यांच्या प्रमुख ओळी या भिंतीवर दिसणार आहेत.

स्वच्छ भारत अभियानात वाचन संस्कृती वाढीस लागावी असा उद्देश या कविता प्रसिध्द करण्यामागे पालिका प्रशासनाचा आहे. मार्चमध्ये केंद्रीय पथक नवी मुंबईतील स्वच्छता आणि सुशोभीकरण पाहण्यास येणार असून तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा या अभियानात जास्त सहभाग असावा यासाठी विशेष गुणांकन ठेवण्यात आले आहे. पालिका त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.

यंदा ठाणे बेलापूर व वाशी बेलापूर रेल्वे मार्गावरील भिंतीदेखील सुशोभित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईला पहिला क्रमांक गेली सात वर्षे चकवा देत आहे. मात्र पहिला क्रमांक मिळेपर्यंत निश्चय केला नंबर पहिला असे घोषवाक्य घेऊन मैदानात उतरलेल्या नवी मुंबई पालिकेने यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेत नवी मुंबईला दहा ते चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरात पहिला क्रमांक देऊन केंद्र सरकारने एका अर्थाने हे शहर इंदूरशी तुलना करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. हगणदारीमुक्त शहर स्पर्धेतही पालिकेला अव्वल मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी यंदा पालिकेने शहरात यापूर्वी रंगविण्यात न आलेल्या भिंती व ठिकाणे यावेळी निवडण्यात आलेली आहेत. यात ठाणे तुर्भे रेल्वे मार्गावरील दुर्तफा भिंतीचा समावेश असून तिची रंगरंगोटी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मोक्याच्या भिंतीवर देशातील नामवंत कवींच्या कविता, कॅलीग्राफी अंतर्गत उतरविण्यात येणार आहे. त्यामुळे हे शहर ये कवितेच्या नगरी या बिरुदावलीला यंदा साजेसे ठरणार आहे. कवि. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, बालकवी, यासारख्या दिग्गज कवींच्या कविता नागरिकांना येता-जाता पदपथाजवळील भिंतीवर दिसणार असून त्या वाचण्याचा आनंद घेता येणार आहे.

मराठीसह इतर भाषांनाही प्रधान्य

शहर कॉस्मोपॉलिटीन असल्याने मराठी भाषेबरोबरच इतर भाषांतीलही प्रसिध्द कविता त्या कवींच्या नावानिशी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. काही दिवांसापूर्वी पालिकेने वाशी येथील भावे नाटय़गृहात स्वच्छ कविता महोत्सव आयोजित केला होता. त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यावरून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात येणार आहे.

वाचन संस्कृती वाढीस लागून मराठी भाषा जतन करता यावी यासाठी पालिकेचा हा एक प्रयत्न असणार आहे. याशिवाय यंदा तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग या अभियानात व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prominent lines of famous indian poets displayed on wall in navi mumbai zws
First published on: 20-01-2022 at 01:49 IST