सिडको वसाहतींमधील रहिवाशांना नववर्षी पनवेल शहर महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मालमत्ता कराच्या नोटिसा मिळण्याची शक्यता आहे.

मागील तीन वर्षांचा थकीत कर एकत्रित भरावा लागणार आहे. शहरी मालमत्ताधारकांप्रमाणे औद्योगिक वसाहतींतील उद्योगांचा मालमत्ता कर दीडपटीने वाढणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत सुमारे ६०० कोटी रुपये जमा होणार आहेत.

सुमारे १२ कोटी रुपये खर्चून पनवेल शहर महापालिकेने स्थापत्य आभियांत्रिकी कंपनीकडून पनवेलकरांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून घेतले आहे. यात तीन लाख मालमत्ताधारकांची पालिकेकडे नव्याने नोंद झाली आहे. सध्या पनवेल नगर परिषद हद्दीत राहणारे आणि २९ गावांत राहणारे नागरिक मालमत्ता कर भरतात. सिडको वसाहतींमध्ये खारघर, कळंबोली, तळोजा, नावडे, कामोठे, नवीन पनवेल आणि खांदेश्वर या वसाहतींतील मालमत्ताधारक सिडको मंडळाकडे सेवा शुल्क भरतात. त्यामुळे सिडको वसाहतींमधील नववर्षी करसंकलनासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

वर्षांला सुमारे २०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या स्वरूपात पालिकेला मिळणार आहेत. काही मालमत्ताधारकांनी सर्वेक्षणा वेळी आक्षेप नोंदविल्याने अखेरच्या ३९ इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर तातडीने पालिका प्रशासन सुमारे तीन लाख मालमत्ताधारकांकडून कर संकलनासाठी नोटीस पाठविणे, नागरिकांमध्ये जागृती करणे, कराचे नागरिकांना होणारे लाभ, मालमत्ता सर्वेक्षणात असणारी पारदर्शकता ही कामे हाती घेणार आहे.

फेब्रुवारीध्ये मालमत्ताधारकांना कराच्या सर्व नोटीस हातात मिळाल्यानंतर पहिल्या १५ दिवसांत कर ऑनलाइन जमा करणाऱ्यांसाठी पालिकेने पाच टक्क्यांची सवलत ठेवली आहे. ५०० चौरस फुटांच्या सदनिकाधारकांना वर्षांला सुमारे दहा हजार रुपयांच्या आत कर भरावे लागणार असल्याचा अंदाज पालिकेच्या कर संकलन विभागाने बांधला आहे. तसेच वाणिज्य वापरासाठी मालमत्ताधारकांसाठी वेगळा दर, तसेच औद्योगिक वापरासाठी वेगळा दर असणार आहे. सध्या ग्रामपंचायतींच्या कर रचनेप्रमाणे औद्योगिक वसाहतीत करवसुली सुरू होती. अत्याधुनिक ड्रोनच्या साह्य़ाने पनवेल पालिकेने मालमत्तांचे सर्वेक्षण केल्याने तंतोतत चौरस फुटाचे मापके घेऊनच मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या जातील, असा विश्वास कर विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

कर भरणाऱ्यांना सवलत

नोटिसा मिळाल्यानंतर ऑनलाइन कर व एकत्रित तीन वर्षांचा कर भरल्यास सवलत, पर्जन्य जल संधारण करणाऱ्या गृहसंस्थांना सवलत आणि शून्य कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंस्था आणि मालमत्ताधारकांना सवलत, सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या गृहसंस्थांना सवलत मिळणार आहे. याशिवाय गृहसंस्थांमधील मोकळ्या जागा आणि वाहनतळ परिसराचा एकत्रित कर वेगळा भरावा लागणार आहे.

कर का भरावा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल पालिकेने सोयीसुविधा दिल्या नाहीत, कचरा व आरोग्य सुविधा हस्तांतरण नुकत्याच हस्तांतरण झाल्या आहेत. सध्या रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याचा पत्ता नाही. पालिकेने कर संकलन पायाभूत सुविधा देऊन वसूल करणे अपेक्षित आहे. तीन वर्षांत पनवेल पालिका प्रशासनाने सिडको वसाहतींत केलेली विकासकामे दाखवावीत, असा आग्रह नागरिकांनी धरला आहे.