पनवेल : मुंबई गोवा महामार्गाच्या गेल्या १५ वर्षातील रखडलेल्या रस्तेकाम विरोधात बळीराजा सेना आणि जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पनवेल येथील पळस्पे फाटा येथे गणपतीच्या पाटाचे विधिव्रत पूजन करून लक्षवेधक आंदोलन केले. धोकादायक महामार्गाचा अवलंब टाळावा, या सरकारला जाग यावी म्हणून कोकणात जाणा-या महामार्गावर लांजा ते पनवेल या ठिकाणी दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानालगत गणेशमूर्तींचे स्थापना करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची घोषणा संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन ठिकाणी केली. 

गेल्या १५ वर्षात ४५३१ जणांनी मुंबई गोवा महामार्गावर विविध अपघातांमध्ये आपले प्राण गमावले. सरकारने ७०० किलोमीटरचा समुद्धी महामार्गाचे काम अवघ्या पाच वर्षात पूर्ण केले. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे ४७१ किलोमीटरचे काम १६ वर्षे रखडल्याने बळीराजा सेना आणि जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी पळस्पे येथील आंदोलनातून संताप व्यक्त केला. महामार्गाच्या कामात भूसंपादनाचा अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून कोकणाला बदनाम केले जात आहे.

प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी मंत्र्यांचे दौरे या महामार्गाच्या पाहणीसाठी केले जातात. मात्र हा निव्वळ दिखावा असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.कोकणात जाण्यासाठी पूर्वीचे अरुंद महामार्ग सूरक्षित होता. मात्र कॉंक्रीटचा महामार्गावर अनेकांची बळी गेल्याने या सरकारला पथकर वसुली आणि कंत्राटदारांची चिंता लागली आहे.

सरकारने या महामार्गावर रस्ते अपघातामधील मृतांच्या वारसदारांना सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी रविवारी आंदोलकांनी केली. हा महामार्ग सूरक्षित वापरता येईल असा बांधावा अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. रस्ते बांधणारे अधिकारी, कंत्राटदार आणि सरकारमधील काही राज्यकर्त्यांच्या संगनमतामुळे या महामार्गाचे काम अपुर्ण राहील्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जन आक्रोश समितीचे अजय यादव आणि विदेश कदम यांनी सुद्धा १५ वर्षे रखडलेल्या या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण केल्यानंतर सागरी किनारा महामार्ग, द्रुतगती महामार्ग यांसारख्या प्रकल्पांची कामे सुरूवात करा अशी मागणी यावेळी केली. 

प्रत्येक पक्षातील नेते आणि ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने कोकणाला महत्वाचा असणारा हा महामार्ग रखडला आहे. साडेचार हजारांचा बळी या महामार्गावर गेला तरी या नालायक सरकारला जाग येत नाही. सरकार आणि ठेकेदार यांच्याकडून या महामार्गातील अपघाती बळी नव्हेतर हे त्यांच्या संगनमतातून होत असलेले खून आहेत. यापूढे असे खून पडू नयेत.

महामार्ग सूरक्षित व लवकर बांधवा. ज्यांचे नातेवाईक या अपघातात बळी गेले त्यांच्या तरूण वारसदारांना सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत मिळावी अशी आमची मागणी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांनी या धोकादायक महामार्गावरून जाऊन स्वताचा जिव धोक्यात घालण्यापेक्षा आम्ही कोकणवासी या महामार्गावर गणपती उत्सव साजरा करत आहोत. लांजा ते पनवेल असे नऊ दिवस गणेशोत्सव महामार्ग साजरा केला जाईल. त्यानंतर शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुद्धा उत्सव साजरा केला जाईल. अशोक वळम – संस्थापक, बळीराजा सेना