निर्बंधातून ग्रंथालये, अभ्यासिकांना काहीसा दिलासा

नवी मुंबई : शहरात करोना रुग्णवाढ होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने २८ जूनपासून ५ जुलैपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रंथालये व अभ्यासिका यांना काहीसा दिलासा दिला आहे. तर अतिसंक्रमित ठरणाऱ्या सोसायटय़ांनी नियमावलींचा भंग केल्यास १० हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहेत.

करोना दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार शहरातील बहुतांश व्यवहार ४ जूनपासून सुरू करण्यात आले होते. परंतु करोनाचे संकट अद्यापही कायम असून डेल्टा प्लसच्या संभाव्य धोक्यामुळे २८ जूनपासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

शहरातील ग्रंथालयांना व अभ्यासिकांना सवलत दिली आहे. सोमवार ते शुक्रवार ग्रंथालये ही सकाळी १० ते ४ या वेळेत तर नवी मुंबई महापालिकेच्या अभ्यासिका सकाळी  ७ ते ४ या वेळेत सुरू राहणार आहेत. या आस्थापना आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यामुळे स्पर्धा परीक्षा तसेच वाचकांना पालिकेच्या र्निबधामधून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु मास्कशिवाय कोणालाच प्रवेश दिला जाणार नाही.

वारंवार रुग्ण आढळल्यास अशा सोसायटय़ा हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या जाणार आहेत. त्या सोसायटय़ांमधील सर्वाचीच करोना चाचणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे या सोसायटीमधून नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरून कोणाला प्रवेशही करता येणार नाही. याबाबत संबंधित सोसायटय़ांनी प्रतिबंध घालावेत असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या सोसायटय़ांनी  नियमांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस १० हजार, दुसऱ्या वेळेस २५ हजार व तिसऱ्या वेळेपासून प्रत्येक वेळी ५० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.

शहरात सार्वजनिक ग्रंथालये यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. मागील वर्षीपासून अनुदानाविना चालवण्यात येत असलेली ग्रंथालये आर्थिक संकटांना सामोरे जात आहेत. सातत्याने होणाऱ्या टाळेबंदीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शहरातील अभ्यासिका व ग्रंथालये ठरावीक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

  – ललित पाठक, संस्थापक, कवी कुसुमाग्रज सार्व. वाचनालय, सीवूड्स