रबाळे-घणसोली उड्डाणपुलाचे गुढीपाडव्यापर्यंत लोकार्पण; अंतिम टप्प्यातील कामे शिल्लक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सर्वात मोठी उपाययोजना ठरणाऱ्या रबाळे ते घणसोली या एक हजार ४०० मीटरच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून तो गुढीपाडव्यापर्यंत वाहतुकीस खुला करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या उतारावरील ४०० मीटर भागाचे आणि पुलाचे अस्फाल्टिंग, रंगरंगोटी, दोन तुळया जोडणे, कठडे बांधणे यांसारखी जुजबी कामे शिल्लक आहेत, मात्र येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता एमएमआरडीएने वर्तविली आहे. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ती १८ मार्चला संपत आहे.

ठाणे-बेलापूरवरील वाहतूककोंडी कमालीची वाढली आहे. तुर्भेपर्यंत वाहतूककोंडीची बेटे तयार झाली आहेत. घणसोली, तळवली आणि गोठवली गावाकडे जाणारे रस्ते हे या मार्गावरच येऊन मिळत असल्याने कोंडीत भर पडत आहे. यावर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने रबाळे रेल्वे स्थानक ते घणसोली रेल्वे स्थानकापर्यंत एक उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी तयार केला होता. पूल एमएमआरडीएने बांधावा म्हणून तात्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी आग्रह धरला. त्यामुळे एमएमआरडीएने दीडशे कोटी रुपये खर्च करून हा पूल आणि सविता केमिकल्सजवळ आणखी एक उड्डाणपूल बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय महापे एमआयडीसीतून कोपरखैरणेत जाण्यासाठी एक भुयारी मार्गदेखील बांधला जाणार आहे. त्यापैकी रबाळे ते घणसोली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण न करता १,४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना उतार बनविण्याचे काम सुरू आहे. उर्वरित कामे येत्या महिन्यात पूर्ण होऊ शकतील, असे  एमएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितले.  या भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या पुलाचा फार मोठा उपयोग होणार असून महापे एमआयडीसीत जाणारी वाहने रबाळे येथे पुलावर चढल्यानंतर थेट घणसोली, गोठवली, तळवली या गावांतील अंतर्गत वाहतुकीला अडथळा निर्माण न करता घणसोली उड्डाणपुलावर जाणार आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल खुला होण्याची वाहनचालक अतुरतेने वाट पाहत आहेत.

ऐरोली-दिवा पुलाची गरज

नवी मुंबईत एमएमआरडीए शिळफाटा ते महापे हा ४०० मीटर लांबीच व  आता दोन उड्डाणपूल बांधत आहे, मात्र रबाळे घणसोली उड्डाणपुलावरून येणारी भरघाव वाहने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ थांबून वाहतूककोंडी होणार हे स्पष्ट दिसत आहे. सध्या मुलुंडकडे वळणाऱ्या रबाळे उड्डाणपुलाखाली मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ऐरोली सेक्टर पाच ते दिवा सर्कलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याची गरज भासणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी फोडू शकणाऱ्या या रस्त्याचे काम १० मार्च २०१५ रोजी सुरू करण्यात आले होते. त्याची मुदत येत्या मार्चमध्ये संपत आहे. आता पुलाची जुजबी कामे शिल्लक असून ती एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

– मिलिंद जैतपाल, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए

 

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabale ghansoli flyover likely to open on gudi padwa
First published on: 28-02-2018 at 02:34 IST