उरण : महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पूर्व विभागात विजेचा लपंडाव आता वारंवार वाढला आहे. वीजवाहिन्यांतील नादुरुस्तीमुळे वीज खंडित होत असून याचा फटका येथील नागरिक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी वर्गाला बसत आहे.

महावितरणची वीज अनेकदा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रात्री- अपरात्री केव्हाही आठ-आठ तास वीज गायब होत असते. त्यात सध्या डासांचा उपद्रवही वाढल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. उरण तालुक्यातील पूर्व भाग विकसित होत आहे. विविध कंपन्यांची गोदामे या ठिकाणी आहेत. यामुळे विजेच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. असे असतानाही विजेच्या रोहित्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

उरण पूर्व भागात येणारी वीज ही सुमारे ७० ते ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फीडरवरून आणली जाते त्यात ही संपूर्ण वीजवाहिनी ही रस्त्यांच्या कडेकडेने आलेली आहे. या रस्त्यांवर सध्या प्रचंड वाहतूक वाढली असल्यामुळे एक तरी वाहन या खांबांना धडकले तर वीज खंडित होते. तर उरण पूर्व भागात भरावामुळे वीजवाहिन्या जमिनीलगत आल्या आहेत. यामुळे येथे कायम अपघात होऊन या वीजवाहिन्या तुटल्या जातात.

७० हजार ग्राहकांचे नुकसान

तालुक्यात सुमारे ७० हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये ७०० ते८०० हे व्यावसायिक प्रकारचे ग्राहक आहेत. तालुक्यात सुमारे ५०० रोहित्र आहेत. उरण पूर्व भागात सुमारे ७० ते ७५ किलोमीटर लांबून वीज आणावी लागते. त्यामुळे इथपर्यंत येताना वीज वाहिनीमध्ये काहीतरी समस्या येऊन रोज वीज खंडित होते. अशाच प्रकारचा फटका हा उरण शहर आणि परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना बसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण पूर्व विभागातील वीज खंडित झाली होती, मात्र येथील रोहित्रामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. आता वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. – जयदीप नानोटे, अतिरिक्त अभियंता, महावितरण उरण.