सुविधांअभावी रुग्णांची पाठ; प्रसूतीसाठी वाशीला रवानगी
राजमाता जिजाऊ माता-बाल रुग्णालय, ऐरोली
गोठवली गावातील गर्भवतीला प्रसूतिवेदना सुरू असताना ऐरोलीतील माता-बाल रुग्णालयातून वाशीतील रुग्णालयात, तिथून मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले. या टोलवाटोलवीत तिची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. माता-बाल रुग्णालये असूनही नवी मुंबईकरांना ठाणे, मुंबई का गाठावी लागत आहे, याची कारणे स्पष्ट करणारी, प्रसूतिगृहांच्या वेदना मांडणारी ही मालिका..
माता-बाल रुग्णालय आहे आणि त्यात स्त्रीरोग तज्ज्ञच नाहीत, अशी अशक्य वाटणारी स्थिती ऐरोलीतील राजमाता जिजाऊ माता-बाल रुग्णालयात आहे. एखाद्या गर्भवतीला वेदना सुरू झाल्यानंतर येथे आणल्यास तिची रवानगी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय केली जाते. प्रसूतीनंतर पुन्हा ऐरोलीला आणून सोडले जाते. वाशी रुग्णालयात जागा नसल्यास तिथून कळवा किंवा मुंबईतील रुग्णालयांचा रस्ता दाखवला जातो. प्रसूतीवेदना सहन करत एवढी मजल-दरमजल करताना गर्भवती आणि तिच्या नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येतो. अशी स्थिती असल्यामुळे रुग्णांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी १५० खाटांच्या या रुग्णालयात नेहमीच शुकशुकाट दिसतो.
महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून ऐरोलीत माता-बाल रुग्णालयाची पाचमजली प्रशस्त इमारत बांधली. रुग्णालय सुरू होण्यास विलंब झाला, तरीही सुसज्ज रुग्णालय मिळणार, कमी दरात चांगले उपचार मिळणार या विश्वासाने ऐरोली परिसरातील रहिवासी सुखावले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या सुमारास येथे बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यात आला. ऑगस्ट २०१५ मध्ये इतर सुविधा पुरविण्यात आल्या, मात्र त्या केवळ नावापुरत्याच अस्तित्वात आहेत.
स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील प्रसूती कक्षात (लेबर वॉर्ड) एकही महिला नाही. काम नसल्यामुळे येथील परिचारिका, सफाई कामगार, आया आणि मावशा गप्पा मारत असल्याचे किंवा डुलक्या काढत असल्याचे दिसते. गंभीर अवस्थेतील रुग्ण आल्यास उपचार केले जातात, मात्र अनेकदा त्यांना आवश्यक उपकरणे नसल्याचे कारण देत वाशी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो, असे सूत्रांनी सांगितले. नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता विभागही बंद आहे.
डेंग्यू, चिकुनगुनियाची तपासणी करण्यासाठी रुग्णांना रुग्णवाहिकेने वाशी येथे सोडले जाते. याच महिन्यात डेंग्यूची एनएस-१ची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी महिन्याला ३९ किट देण्यात येतात, असे सूत्रांनी सांगितले. या तपासणीने डेंग्यूचे निदान न झाल्यास पुढील तपासणीसाठी वाशी रुग्णालयात जावे लागते. रुग्णालयात दंतचिकित्सा विभाग, आहारतज्ज्ञ विभाग, अपंगांसाठीची स्वच्छतागृहे, संगणक नियंत्रण कक्ष यांना टाळे ठोकण्यात आले आहे. निवासी डॉक्टरची सोय नाही. कान-नाक-घसा विभाग, त्वचारोग, मानसिक आजार, बालरोग विभागाचे ओपीडी तसेच बाह्य़रुग्ण विभागासाठी प्रत्येकी एक डॉक्टर आहे. या विभागात येणाऱ्यांच्या चपला ठेवण्यासाठी सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात सर्वत्र चपला पडलेल्या असतात.
केसपेपर काढण्यासाठी एकच काऊंटर आहे. त्यामुळे रुग्णांना लांबलचक रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. केसपेपर हाताने लिहून बनवले जातात. दोन रुग्णवाहिका आहेत. दोन्ही रुग्णवाहिका वाशी येथे रुग्णांना सोडण्यासाठी गेल्यास रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे गर्भवतींना तासभर तिष्ठत राहावे लागते. ‘मी रुग्णालयात बाह्य़रुग्ण विभागात तपासणीसाठी गेलो असता, डॉक्टरांनी मला न तपासताच गोळ्या दिल्या,’ असे बजरंग वाघमारे या ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
स्त्रीरोगतज्ज्ञाच्या नियुक्तीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती केल्यास येथे रुजू होण्यास स्त्रीरोगतज्ज्ञ तयार होती, त्यामुळे त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय विभागासाठी ३६२ संगणकांची मागणी करण्यात आली आहे. त्यांची निविदा थांबवण्यात आली आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत, त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.
– रमेश निकम, मुख्य वैद्यकीय अधिकारी