पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने बुधवारी शासन निर्णयाव्दारे नवी मुंबई आयुक्तालयात नवीन “परिमंडळ-२, बेलापूर” याची निर्मिती करुन यापूढे पनवेल हे तीसरे परिमंडळ म्हणून कामकाजात ओळखले जाणार आहे. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण, वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस ठाण्यांचे सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शासनाकडे पाठविला होता.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात यापूर्वी वाशी (परिमंडळ १) आणि पनवेल (परिमंडळ २) या परिमंडळामधून कामकाज केले जात होते. नव्या शासन निर्णयानूसार बेलापूर या नवीन परिमंडळाला यापूढे परिमंडळ २ आणि पनवेल हे परिमंडळ ३ अशी ओळख मिळाली आहे.बेलापूर परिमंडळासाठी सरकारने एक पोलीस उपायुक्त आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्त पदांची मंजूरी दिली आहे. त्यासाठी दरवर्षी ३८.१८ लाख इतका खर्च येणार असून त्या खर्चाला सुद्धा मंजूरी देण्यात आली आहे.१४ जुलै रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाचे उपसचिव रा.ता. भालवणे यांनी आदेशात म्हटले आहे.
या निर्णयानुसार परिमंडळांची नवीन रचना पुढीलप्रमाणे असेल:
परिमंडळ-१: वाशी
परिमंडळ-२: बेलापूर (नवीन)
परिमंडळ-३: पनवेल