कोपरखैरणे सेक्टर आठ येथे मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली मात्र यात अनेक ठिकाणी चेंबरमधून पाणी वाहतच असून काही ठिकाणी काम झाले नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. काही रहिवासी संघांनी याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही
कोपरखैरणे आठ हा बहुल माथाडी कामगार वस्तीचा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी घर क्रमांक १ ते ४५० , ८९३ ते १०४२ या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्यांचे काम करण्यात आले. ८ फेब्रुवारी २०२४ ते ऑगस्ट पर्यंत कामाची मुदत होती. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षे कालावधी होता.
ही कामे पूर्ण झाली असून त्याचे देयक संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम झालेली नाहीत असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. याबाबत आदर्श ओनर्स असोसिएशनने मलनिस्सारण अभियांत्रिकी विभागाला मे २०२५ ला पत्र दिले होते. त्यानुसार तीन गल्ल्यांत ही कामे सुरू होती. मात्र मध्येच अचानक थांबवण्यात आली आहेत. ज्या वाहिन्यांची कामे झाली त्या वाहिन्या मुख्य वहिनीला जोडण्यात आलेल्या नाहीत. अद्याप २० टक्के काम झालेले नाही. असा दावाही पात्रात करण्यात आला आहे.
मलनिस्सारण वाहिन्या अनेक ठिकाणी नादुरुस्त असून काही ठिकाणी पाण्याची वाहिनी त्या जवळ असल्याने आरोग्याचा उद्भवू शकतो, अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिल्या. आमदार निधीचा हा गैरवापर असल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत माहिती घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले.
या बाबत मी स्वतः दोन वेळा मनपाला पत्र दिले आहे. मात्र पत्र देताच काही दिवस काम केल्यासारखे दाखवले मात्र काम पूर्ण होत नाही. आताही या परिसरात दुर्गंधी असून उंदीर आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाने काम पूर्ण झाले नाही तरी कंत्राटदाराचे देयके अदा केले असून ही गंभीर बाब आहे. – रवींद्र म्हात्रे,माजी नगरसेवक