उरण : ओएनजीसीच्या अरबी समुद्रातील तेल विहिरीतून येणाऱ्या वाहिनीला सोमवारी दुपारी गळती लागून स्फोट झाल्याने भीषण आग लागली होती. या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा ओएनजीसी परिसर आणि उरण तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. दरवर्षी किमान एकतरी आग आणि तेल गळतीची घटना या प्रकल्पात घडत आहे. मात्र त्यानंतरही सुरक्षा मजबूत होतांना दिसत नाही.
सोमवारी लागलेल्या आगीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ओएनजीसीमध्ये अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे उरण परिसरातील तेल,वायू व अतिज्वलनशील पदार्थांची साठवणूक करणाऱ्या वाहिन्यांमधून तेल चोरीच्या घटनांतही वाढ झाली आहे. तालुक्यातील विविध खासगी गोदामात असलेल्या हानिकारक कंटेनरनाही भयाण आगी लागू लागल्या आहेत. उरण परिसराला अग्नितांडवाचा धोका निर्माण झाला असल्याने अग्निरोधक सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
१९७५ ला मुंबई आणि उरण पासून २५० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कच्च्या तेलाच्या विहिरी आढळल्या. त्यानंतर या विहिरींतून उपसा करण्यात येणारे कच्चे तेल (क्रूड ऑईल) वाहिनीद्वारे उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यातून अनेक प्रकारच्या इंधनाची वर्गवारी केली जाते. या प्रकल्पावर आधारित व वायू विद्युत निर्माण करणारा प्रकल्प आणि भारत पेट्रोलियमचा घरगुती वायू भरणा प्रकल्प हे दोन प्रकल्प उरण मध्ये सुरू आहेत. तर जेएनपीए बंदरातून आखाती तसेच इतर देशातून दररोज लाखो मेट्रिक टन वायू, तेलाची जहाजाद्वारे आयात केली जाते.
या तेल व ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करण्यासाठी बंदराच्या परिसरात लाखो लीटर क्षमता असलेल्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरण परिसरात कोट्यावधी लीटर तेल व ज्वलनशील पदार्थ साठवणूक केली जाते. त्यासाठी तेल आणि वायू वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. यातील ओएनजीसी प्रकल्पात अनेकदा अतिज्वलनशील पदार्थांना आग लागल्याने कामगार आणि स्थानिकांचा या आगीत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ओएनजीसीचा सज्जतेचा दावा
सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात लागलेली आग ही जुन्या कोरड्या तेल वहिनीला लागली होती. ती तातडीने विझविण्यात आली. या आगीत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. ओएनजीसी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून त्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन दल आणि प्रशिक्षित जवान तसेच अत्याधुनिक यंत्र सामग्री सज्ज असल्याचा दावा ओएनजीसी प्रशासनाने पत्राद्वारे केला आहे.
उच्चस्तरीय समिती
सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट न झाल्याने ओएनजीसी व्यवस्थापनाकडून आगीच्या कारणाच्या शोधासाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या निष्कर्षावरून आगीचे खरे कारण समोर येईल. त्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती ओएनजीसी प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
ओएनजीसी प्रकल्पात वारंवार होणारी तेल,वायू गळती आणि आग लागणे या घटनांमुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून तहसीलदार कार्यालयाकडून या घटनांच्या चौकशीसाठी पत्र दिले जाणार आहे. व्यवस्थापनाने आपत्ती व्यवस्था बळकट करण्याची सूचना करण्यात येणार आहेत.- डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण.