अनियमित वीज, अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवाशांचे हाल

उरण नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या असून त्यासाठी विविध पक्षांचे उमेदवार मतदारांकडे मत देण्याची विनंती करू लागले आहेत. पालिकेचा प्रभाग क्रमांक १ हा कोळीबांधवांचा विभाग आहे. येथील नागरिकांनी २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांना महसूल विभागाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दिवसातून चार तास खंडीत होणारी वीज आणि  पिण्याचा अपुरा पुरवठा यामुळे येथील नागरीक त्रस्त आहेत.

[jwplayer CdTbNsE8]

अशाच प्रकारची स्थिती प्रभाग क्रमांक २ मध्येही असून डोंगरावरील झोपडपट्टीतील नागरीक आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांनी ग्रासलेले नागरीक पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदार राजे बनले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत समस्या सोडविण्यासाठी मतदान करणार का हाच प्रश्न आहे.

उरण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (२७) नोव्हेंबरला होत आहेत. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक- एक मधील मोरा पारसी अग्यारी, ख्रिश्चन वाडी, ग्राईंडवेल कंपनी, मोरा कोळीवाडा, मोरा एज्युकेशन सोसायटी, इंडस्ट्रीयल अब्रेसिव्ह कंपनी, एकविरा मंदीर, वाल्मिकी मंदिर परिसर, सिद्धार्थ नगर, सोनार चाळ, सव्‍‌र्हे नंबर ११६ हा परिसर येतो.

या प्रभागात कोळी समाजाची मते निर्णायक असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी कोळी समाजातील उमेदवार निवडणुकीत उतरवलेले आहेत. तर प्रभाग क्रमांक २ मध्ये भवरा हनुमान मंदिर परिसर, रेल्वे बांध, भवरा मस्जीद परिसर, सॉल्ट ऑफीस परिसर, कातकरी वाडी, अजीज मोटर वर्क्‍स, कस्टम चाळ, एनबीबीसीसी कॉलनी, पेट्रोल पंप ते उरण पार्क सोसायटी पर्यंत आहे.

२५ वर्षांपूर्वी मोरा समुद्र किनाऱ्यावर अनेकांनी राहण्यासाठी घरे बांधलेली आहेत. या घरांचे कर भरले जातात. तसेच दंडही भरलेले आहेत. असे असतानाही ऑक्टोबरमध्ये तहसीलदारांनी दंडात्मक कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांवर बेकायदा बांधकामांची टांगती तलवार आहे. या प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम  दोन वर्षांपासून सुरू आहे. तर टाकीतून कमी दाबाने अर्धा तासच पाणी मिळत आहे. त्यातच पाण्याच्या वेळीच वीज खंडित होत असल्याची माहिती मोरा येथील रूक्माबाई कोळी यांनी दिली.

येथील स्मशान भूमीत पाण्याची व्यवस्था नाही. तर या बंदरातून उरण ते मुंबई असा प्रवास करणारे हजारो प्रवाशी आहेत. त्यांनाही अनेक असुविधांना सामोरे जावे लागत असून येथील रिक्षांना अधिकृत  स्थानक नाही. त्यामुळे रिक्षा चालकांना व प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत असल्याची माहीती शांताराम कोळी यांनी दिली.

आधी समस्या सोडवा

प्रभाग क्रमांक २ मध्येही पिण्याच्या पाण्याच्या अनिमिततेची समस्या आहे. तर खारफुटीच्या परिसरात तसेच रेल्वे बांधावरील बांधकामांवरही टांगती तलवार आहे. डोंगरावर असलेल्या झोपडपट्टीतील नागरीकांना वीज,पाणी वेळेत येत नसल्याने त्यांच्या रोजंदारीवरही परिणाम होत आहे. स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता नसल्याची तक्रार येथील नागरीकांनी केली. पाण्याच्या टाकीची व्यवस्था असली तरी त्यातून पाणी मिळत नाही. अशा स्थितीत येथील नागरीक या झोपडपट्टीत राहत आहेत. या निवडणूक निवडूण येणाऱ्यांनी समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा येथील मतदारांना व्यक्त केली.

[jwplayer 9AX3hgPE]