नवी मुंबई : वाशी सेक्टर १९ डी येथून पामबीच रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता सध्या खड्ड्यांमुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे केवळ खोलच नाहीत, तर त्यांच्या खालील सळयाही उघड्या पडल्या असून त्यामुळे अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.
पामबीच गॅलेरिया मॉलजवळील हा रस्ता वाहनांच्या मोठ्या वर्दळीचा आहे. दिवसेंदिवस या खड्ड्यांची व्याप्ती वाढत असून रस्त्यावरील पावसाचे पाणी आणि उघड्या सळया यामुळे हा मार्ग आता अपघातांचा सापळाच बनला आहे. स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मुळात, पामबीच गॅलेरिया मॉल जवळील हा रस्ता पेव्हर ब्लॉकने तयार करण्यात आला आहे. परंतु, जिथे पूर्वी खड्डे पडले होते तो भाग डांबर टाकून बुजवण्यात आला. मात्र, आता पडत असलेल्या मुसळधार पावसात हे डांबर पाण्यात वाहून गेले असून रस्त्या खालील सळ्या बाहेर आल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांच्या देखभालीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना विचारले असता सहाय्यक अभियंत्यांना सूचना देऊन सदर खड्डे बुजवण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांनी सांगितले आहे.
अपघातांना निमंत्रण
मंगळवारी (२९ जुलै) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसात एका दुचाकीस्वाराचा या ठिकाणी अपघात झाला. तो या सळयांपासून थोडा दूर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सळया बाहेर आलेल्या भागावर एखादे वाहन घसरल्यास गंभीर जखमा होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.