पनवेल : पनवेलमधील करंजाडे नोडमधील पुनर्वसित नागरिक तीन वर्षांपासून एकाच तक्रारीची हाकाटी मारत आहेत. “ त्रिवेणी संगमाचे पावसाळी पाणी जाण्यासाठी नाला करा, अन्यथा पाण्यात बुडू” अशी या प्रकल्पग्रस्तांना भिती वाटत आहे. पण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने आजवर कागदा पुरतीच राहिली. अखेर सोमवारच्या संततधारेच्या पावसाने सिडकोच्या या दुर्लक्षाचे परिणाम उघड केले. पुनर्वसन पुष्पक वडघर नोडमधील सेक्टर आर १ व २ या परिसरातील इमारतीखालील रस्ते, वाहनतळ पाण्याखाली गेले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात ज्या शेतक-यांची शेतजमीनीसह राहत्या घरांच्या जमीनी संपादित केली त्याच प्रकल्पग्रस्तांना करंजाडे नोड व पुष्पक वडघर नोड (सेक्टर आर १ आणि २) येथील पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांना हक्काचे भूखंड सिडकोने दिले आहेत. सध्या हेच गावकरी पावसाळ्यात साचणा-या या पाणी समस्येमुळे चिंतेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पावसाळी हंगामामध्ये वसाहतीमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती ओढावते. मात्र सोमवारी अक्षरक्षा प्रत्येक रस्त्यावर एक ते दिड फुट पाणी साचत आहे. रस्ते, इमारतीखालील वाहनतळ आणि पायाभूत सुविधा पाण्याखाली जाऊन नागरिकांना याच पाण्यातून वाट शोधावी लागत आहे.
सिडकोच्या अभियंत्यांची चुकीची नाला आखणी…करंजाडे सेक्टर ३ मधील त्रिवेणी धाम परिसरात पावसाळी ओढ्यात उंचावर आरसीसीच्या जलवाहिनी बसवली आहे. परिणामी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह खुंटला जात असल्याने ओढ्यात मावणारे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे.
उरलेलं पाणी उलट्या दिशेने वाहून पुन्हा सेक्टर आर १ आणि २ च्या गल्ल्या, रस्ते व इमारती पाण्याखाली येत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून ग्रामस्थ पावसाळी समस्येला वैतागले आहेत. चिंचपाडा गावकरी गेले तीन वर्षांपासून सतत पत्रव्यवहार करून या त्रुटीची दखल घ्यावी, अशी मागणी करत असले तरी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी चिंचपाडा येथील जनहित सामाजित संस्था, प्रत्युत्तरात ‘लवकरच नाला बांधू’ अशी दिलेली आश्वासने आजवर फोल ठरली. परिणामी सोमवारच्या पावसात करंजाडेतील निम्म्या वसाहतीला पाण्याचा वेढा बसला.येथे राहणा-या ग्रामस्थांचा आक्रोश वाढत असून “सिडकोच्या दुर्लक्षामुळे भविष्यात कोणतीही हानी घडल्यास संबंधित सिडकोचे अधिकारी जबाबदार असतील” असा इशारा ग्रामस्थ देत आहेत. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क विभागाकडे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.