देशात आर्थिक मंदीचे वातावरण असताना सिडकोच्या महामुंबईतील भूखंडांवर मात्र विकासकांच्या चांगल्याच उड्या पडत असल्याचे दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या तीस भूखंडांच्या लिलावातून स्पष्ट झाले आहे. वाशी, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, बेलापूर या नोडमधील भूखंडांना विकासकांनी पसंती दिली असून यात नवी मुंबई पालिकेने विकास आराखड्यात आरक्षण टाकलेल्या काही भूखंडांचा सहभाग आहे.मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला त्यांच्या मालकीचे भूखंड विकण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पालिकेची पंचाईत होणार असून आरक्षण निरर्थक ठरणार आहे. सिडकोला या विक्रीतून एक हजार ३५५ कोटी ९० लाख रुपयांची कमाई झाली असून तीसपैकी आठ भूखंडांचा लिलाव न झाल्याने ही कमाई दीड हजार कोटी रुपयांचा आकडा गाठू शकली नाही.

पनवेल, उरणला मागणी
मुंबई, ठाणेपेक्षा सध्या नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्राला निवासी उद्देशाने जास्त पसंती आहे. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो, रेल्वे विस्तार, न्हावा शेवा शिवडी सागरी मार्ग यामुळे या क्षेत्राला मागणी वाढली आहे.सिडकोनेही हजारो घरांची विक्री केली असून अनेक घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सिडकोने एक लाख सहा हजार घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या तुलनेत खासगी विकासकही सिडर्को किंव्हा खासगी जमीन घेऊन गृहनिर्मिती करीत आहेत. देशात आर्थिक मंदीचे सावट असून महागाई, बेरोजगरीचा प्रश्न निर्माण झाले आहेत पण त्याचे पडसाद सिडको भूखंडांवर उमटत नसल्याचे दिसून येत आहे .सानपाडामधील भूखंडाला प्रतिचौरस मीटरला ५ लाख ५४ हजारांचा सर्वाधिक दर.

सानपाडा सेक्टर २० मधील एका ५५२६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी डीपीव्हीजी व्हेंचर या बांधकाम कंपनीने ५ लाख ५४ हजार ८९ रुपये प्रति चौरस मीटर दर बोली केला असल्याने त्यांना हा भूखंड मिळणार आहे. त्यांच्यासमोर ४ लाख ७९ हजार रुपये दर भरण्यात आला होता. याशिवाय नेरुळ येथील सेक्टर ४० मधील भूखंडाला ४ लाख ८० हजार रुपये प्रति चौरस मीटरचा दर आला आहे. यापूर्वी नेरुळ मधील एका भूखंडाला ३ लाख ७५ हजार रुपये दर आला होता. पण ५ लाख ५४ हजार आणि ४ लाख ८० हजार रुपये हे आतापर्यंतच्या महामुंबई बांधकाम क्षेत्रातील सर्वाधिक दर आहेत. राज्य सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मुळे विकासकांना ५ पट वाढीव चटई निर्देशांक मिळणार असल्याने नवी मुंबईतील भूखंडांना जास्त दर येत असल्याचे नवी मुंबई बिल्डर असोसिएशनचे हरिष छेडा यांनी सांगितले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.